हुंदके देणारा माणूस म्हणाला,'ज्या नाना पाटलाचा पवाडा म्हणताय तो मीच आहे'!

त्याकाळात शाहीर निकम यांनी इंग्रजी सत्तेला गुंगारा देत प्रतिसरकारचा विचार खेडोपाडी पोचवत एक जनमत तयार केले. अनेक तरुणांना प्रतिसरकारचा भाग बनवले. केवळ डफाच्या माध्यमातून क्रांतीचा विचार पेरणारा हा शाहीर होता. ज्यांच्या वाणीच्या बळावर अनेक लोक घरदार सोडून लढ्यात सहभागी होत होते, स्वतःची संपत्ती देत होते त्या शाहिराची आणि प्रतिसरकारच्या प्रचारमंत्र्यांची आज आठवण होते.
हुंदके देणारा माणूस म्हणाला,'ज्या नाना पाटलाचा पवाडा म्हणताय तो मीच आहे'!

ते दिवस होते ब्रिटीश राजवटीच्या विरोधात सुरु असलेल्या लढाईचे. सातारा-सांगली जिल्ह्यातील क्रांतीविरांनी ब्रिटिश राजवटीसमोर प्रतिसरकार स्थापन करून आव्हान उभं केलं होतं. देशासाठी लढणारे तरुण भूमिगत राहून सरकारच्या विरोधात लढत होते. पोलीस या बंडखोर तरुणांना पकडण्यासाठी धडपडत होते, पण हे भूमिगत सापडत नव्हते. 

त्यावेळच्या दक्षिण सातारा जिल्ह्यातील आटपाडी भागातील एक दुपार. रणरणतं ऊन. या रणरणत्या उन्हात एक माणूस रस्त्याने चाललेला. एका मोकळ्या शेतात काही पोरं गुरे राखत होती. गुरे राखता राखता एका पोराला काय वाटलं कोणास ठाऊक? त्यानं पोवाडा म्हणायला सुरूवात केली... 

इंग्रजाची हड्डी जिरवण्याला 
क्रांतीचा घोष त्यांनी केला 
नाना पाटील त्यात आपला 

नाना पाटील बडा वस्ताद 
देईना दाद घालतो साद 
खेडोपाडी साऱ्या मर्द लोकास 
उठावणी करी क्रांतीयुद्धास 

धडकी भरे पोलीस खात्यास 
बक्षीस लावती फरार क्रांतीवीरास 
परि सांगा त्यास 
धरील कोण जळत्या आगीला ? 
पकडील कोण पळत्या वाऱ्याला ? 
गवसणी कोण घालील आभाळाला ? 

सरकारच्या काखेत शिरून 
बित्तंबातमी असेल कुणी देत 
त्यांना शाहिर ताकीद देणार 
देशाशी फितुरी जे जे करणार 
दिवा नाही त्यांच्या वंशी राहणार ...जी जी जी... 

तो गुराखी मुलगा कानावर हात ठेवून मोठ्या आवाजात हा पोवाडा म्हणत होता. त्याचवेळी तो रस्त्यानं जाणारा माणूस पोवाडा ऐकत उभा होता आणि पोवाडा ऐकताना खांद्यावरील उपरण्यानं डोळं पुसत होता. बराच वेळ रस्त्यावर उभा राहून पोवाडा ऐकत असलेल्या माणसाकडं पोरांचं लक्ष गेलं. ती पोरं त्यांच्याकडे गेली. त्या माणसाला विचारलं, "तुम्ही कोण? आणि तुम्ही का रडताय?' 

हुंदका आवरत तो माणूस म्हणाला, "पोरानू ,आता खरंच सांगतो. तुम्ही ज्या नाना पाटलाचा पवाडा म्हणताय तो मीच आहे. हा पवाडा माझ्या दोस्तानं शाहीर शंकरराव निकमानं रचलाय. पोरानू माझी किरती माझ्या दोस्तामुळं एवढ्या लांबवर आलीया हे बघून मला गहिवरून आलयं. एवढी की ज्या पोरांनी नाना पाटील बघितलेला न्हाय ती बारकी पोरबी माझा पोवाडा म्हणत्याती ! 

साताऱ्यात प्रतिसरकार स्थापन करून इंग्रज सत्तेला आव्हान देणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या आयुष्यातील हा प्रसंग त्यांच्या तोंडून अनेकांनी ऐकला होता. ज्यांनी हा पोवाडा रचला होता ते शाहीर शंकरराव निकम विद्यार्थी असल्यापासूनच नाना पाटील यांच्यासोबत स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. 

लहानपणीच त्यांना गाणी रचायचा नाद लागला. नाना पाटील या शाळकरी पोराला सायकलीवरन गावोगावी नेत. सभेच्या सुरुवातीला ते शाहिरी गाणं, पोवाडा म्हणायचे. त्यानंतर मग सभेला रंग भरायचा मग नानांचे भाषण व्हायचे. या शाहिराला नाना पाटील यांनी प्रतिसरकारचे प्रचारमंत्री केले. हे शाहीर केवळ पोवाडेच म्हणत होते असं नाही, तर त्यांनी ताकारी गावात पोलिसांच्या गाडीवर हातबॉम्ब टाकले होते. 

इंग्रजांचे सरकारी बंगले जाळणे, टपालगाड्या लुटणे या प्रतिसरकारच्या मोहिमांत निकम सहभागी होतेच. पण त्यांच्यावर विशेष जबाबदारी लोकांना जागृत करण्याची होती. मग भूमिगत राहून शाहीर निकम महाराष्ट्राच्या खेडोपाडी जाऊन लोकांना स्वातंत्र्यचळवळीत सहभागी व्हावे म्हणून आवाहन करू लागले. पोलिसांचा ससेमिरा मागे असल्याने त्यांना ठरवून कार्यक्रम करता येत नव्हते. ते अचानक एखाद्या गावात जायचे अन पोवाडा गायचे. लोकांच्या मनात देशभक्तीचा विचार पेरायचा, त्यांना निर्भीड बनवायचे हे काम मोठ्या ताकदीने ते करत होते. लोकांनी या जुलमी राजवटीच्या विरोधात बंड केले पाहिजे, अशा रचना त्यांनी केल्या होत्या. 

"नाही मरणाची आम्हा भीती ग, भरली अंगात स्वराज्याची स्फूर्ती ग' यासारख्या रचना त्यावेळच्या तरुणांच्या ओठी होत्या. 

"एक पाऊल तुमच्या गावात,दुसरं तुरुंगात 
तिसरं स्वर्गात, तमा नाही त्याची शाहिराला। 
कोण कोण येतो मदतीला, वचन द्यावं तेवढं आम्हाला। 

असं आवाहन शाहीर करायचे तेव्हा कित्येक पोरं अंगावरच्या कपड्यावर घराच्या बाहेर पडली आणि प्रतिसरकारमध्ये सामील झाली. एवढी ताकद शाहिरांच्या शब्दांत होती. 

याच मंतरलेल्या काळात पुण्यातील मंडईत एक पोवाड्याच्या कार्यक्रम होता. प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. हा कार्यक्रम एवढा प्रभावी झाला की जमलेल्या लोकांनी शाहिरांच्या अंगावर पैशाचा पाऊस पाडला. त्यावेळच्या नगरसेविका भीमाबाई दांगट यांनी त्यांच्या अंगावरील सर्व दागिने काढून चळवळीसाठी दिले. ही अविस्मरणीय आठवण शाहिरांनी नोंदवून ठेवली आहे. 

दुसरा एक असाच प्रसंग शाहिरांच्या पोवाड्याची ताकद सांगणारा. नेवासे (जि. अहमदनगर) येथील पोवाड्याच्या कार्यक्रमात त्यानी लोकांना अन्न नाही म्हणून गप्प बसू नका तर सरकारची धान्याची कोठार लुटा, असं सांगितलं आणि लोकांनी खरोखर कोठार लुटली. लोकांना चिथावणी दिली म्हणून निकम आणि त्याच्या सहकाऱ्यावर अटकेचे आदेश निघाले. पण सतत लोकांच्या घोळक्‍यात असलेल्या या स्वातंत्र्यशाहिराला नगरचे पोलीस पकडू शकले नाहीत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com