shaetty on ministry issue | Sarkarnama

मी मंत्रीपद मागितलेले नाही : शेट्टी 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 18 ऑगस्ट 2017

मंत्रीपदासाठी लॉबिंग करावे लागते, मी असे काही केलेले नाही किंवा मी स्वतः मंत्रीपद मागितलेले नाही, असे सांगत श्री. शेट्टी यांनी आपण स्वतः मंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचेही सांगितले. 

कोल्हापूरः कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची "स्वाभिमानी' तून हकालपट्टी झाली आहे. त्यामुळे श्री. खोत आमच्यासोबत नाहीत, समझोत्यानुसार आमची मंत्रीपदाची जागा रिक्त झाल्याचे सांगत "स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी यांनी सरकारकडे अप्रत्यक्षरित्या आणखी एका मंत्रीपदाची मागणी केली आहे. 
दरम्यान, मंत्रीपदासाठी लॉबिंग करावे लागते, मी असे काही केलेले नाही किंवा मी स्वतः मंत्रीपद मागितलेले नाही, असे सांगत श्री. शेट्टी यांनी आपण स्वतः मंत्रीपदासाठी इच्छुक नसल्याचेही सांगितले. 

महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी श्री. खोत यांचे मंत्री पद कायम राहील असा निर्वाळा देतानाच "स्वाभिमानी' ला आणखी एक मंत्रीपद देण्याची तयारी दर्शवली आहे. या पार्श्‍वभुमीवर संघटनेच्या नागाळा पार्क येथील कार्यालयात आलेल्या श्री. शेट्टी यांच्याशी संपर्क साधला. 
ते म्हणाले,"सरकारसोबत रहायचे की नाही याचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीतच होईल. आमच्या संघटनेतच फूट पडली आहे असे नाही तर भाजपसह सर्वच पक्षात फूट आहे. सद्या स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणे हेच आपल्यापुढील मुख्य ध्येय आहे.' 
शेतकऱ्यांची सुकाणू नव्हे तर जिवाणू समिती असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, याकडे लक्ष वेधले असता श्री. शेट्टी म्हणाले,"कुणी काहीही म्हटलं तरी शेतकऱ्यांच्या एकजुटीला कधीही बाधा येणार नाही. येत्या आठवडाभरात विदर्भात शेतकऱ्यांचा भव्य मेळावा घेऊन शेतकऱ्यांच्या एकीची ताकद सरकारला दाखवली जाईल.' 

मी स्वतःसाठी मंत्रीपद मागितलेले नाही. मंत्री मंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली की जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जातात. मंत्रीपदासाठी लॉबिंग करावे लागते ते मी केलेले नाही, अशी पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली. 
 

संबंधित लेख