Sena MLA's oppsed BJP MLA's quote over loan waiver to farmers | Sarkarnama

विधानसभेत शिवसेना भाजप आमदार आमने सामने

ब्रह्मदेव चट्टे- सरकारनामा ब्युरो
बुधवार, 5 एप्रिल 2017

मुंबई - विधानसभेत आज शिवसेना भाजपचे आमदार एकमेकाविरोधात चांगलेच भिडले होते. विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज नसल्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगताच शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले.

मुंबई - विधानसभेत आज शिवसेना भाजपचे आमदार एकमेकाविरोधात चांगलेच भिडले होते. विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची गरज नसल्याचे भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी सांगताच शिवसेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले.

आमदार प्रशांत बंब विधानसभेत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून चर्चा करताना म्हणाले, "मी म्हणतोय त्याला अनेक जणांचा विरोध होईल. तरीही मी सांगतो शेतकऱ्यांना कर्जमाफी नको, शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज नाही", बंब यांनी असे सांगताच सेनेचे आमदार चांगलेच आक्रमक झाले. यावेळी विधानसभेत सेनेचे आमदार प्रशांत बंब यांनी उद्देशून जाब विचारू लागले. आमदार बंब गोंधळातच "मला माझे म्हणणे मांडू द्या, मला बोलू द्या, अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या" म्हणत अध्यक्षांकडे बोलण्याची मागणी करत उभे राहिले होते.

सेनेचे आमदार शंभूराजे देसाई, सुनिल प्रभू, सुभाष साबणे यांच्यासह सेनेचे आमदार यावेळी चांगलेच आक्रमक होते. आमदार प्रशांत बंब यांचे कर्जमाफी नको म्हणण्याचे विधान शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे असल्याचे सांगत शिवसेनेचे आमदार बंब यांच्या जवळ जावून शेतकऱ्यांची कर्जमाफी का नाही ? याचा जाब विचारू लागले. यावेळी भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आमदार प्रशांत बंब यांच्या जवळ येत सेनेच्या आमदारांना शांत करण्याचा प्रयत्न केला. यावेळी हमरी तुमरीची वेळ आली होती. सेनेचे आमदार प्रशांत बंब यांना मारतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

यावेळी शिवसेनेचे राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी सेनेच्या आमदारांना रोखून धरले. गोंधळ वाढत असल्याचे बघून भाजपचे प्रतोद राज पुरोहितही प्रशांत बंब यांचे संरक्षण करण्यास धावले. गोंधळ वाढल्याने अखेर अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सर्वांना गप्प बसण्याचे आदेश दिले.

संबंधित लेख