secretary said i will study , but he said don't study give praposal: Kalyan kale | Sarkarnama

सचिव म्हणाले अभ्यास करतो , साहेब म्हणाले अभ्यास नको प्रस्ताव द्या : कल्याण काळे 

जगदीश पानसरे 
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

हा निर्णय घेतला नाही तर काळी-पिवळी चालक ओव्हरसीट भरतील, त्यातून दुर्घटना घडू शकते. त्यापेक्षा जीपच्या क्षमतेनूसार परवाना देऊ. ज्यामुळे आरटीओचा महसुल वाढेल आणि हप्तेखोरीही बंद होईल असा टोला देखील त्यांनी परिवहन सचिवांना लगावला होता.

औरंगाबाद; माजी मुख्यमंत्री लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांची सर्वसामान्यांचा प्रश्‍न सोडवण्याची हातोटी निराळीच होती. एखादा जटील प्रश्‍न ही सखोल कायदेशीर माहित्याच्या आधारे ते चुटकी सरशी सोडवत असत. या संदर्भातील एक प्रसंग कॉंग्रेसचे माजी आमदार व विलासरावांचे स्नेही असलेल्या डॉ. कल्याण काळे यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितला. 

2006 मध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना औरंगाबादेत आले होते. विमानतळावर त्यांना भेटण्यासाठी राष्ट्रवादीचे मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्या नेतृत्वाखाली काळी-पिवळी टॅक्‍सीचालकांचे एक शिष्टमंडळ विलासरावांना भेटण्यासाठी आले. 

काळी-पिवळी जीपची क्षमता 9 अधिक 1 असतांना परिवहन विभागाकडून मात्र 4 अधिक 1 चा परवाना देण्यात आला होता. त्यामुळे खूप नुकसान होते अशी संघटनेची भावना होती. ओबेरॉय या संघटनेचे अध्यक्ष होते. विलासरावांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि तासाभराने पुन्हा विमानतळावरच भेटा मी स्कोडामध्ये जाऊन येतो असे सांगितले. 
 

स्कोडा कंपनीत जातांना मी व आमचे काही कॉंग्रेस पदाधिकारी विलासरावांसोबतच होते. पैकी एकजण म्हणाला, साहेब ते ओबेरॉय राष्ट्रवादीचे आहे, कशाला त्यांचा प्रश्‍न सोडवायचा. तेव्हा विलासराव म्हणाले मनमोहनसिंग ओबेरॉय जरी राष्ट्रवादीचे असले तरी काळी-पिवळीचे चालक, मालक आणि क्‍लिनर हे कॉंग्रेसच्या विचारसरणीचे आणि सामान्य आहेत. त्यामुळे त्यांचा प्रश्‍न सोडवावाच लागेल. 

मुंबईला परत जाण्यासाठी विलासराव पुन्हा विमानतळावर आले तेव्हा काळी-पिवळी चालक संघटनेचे शिष्टमंडळ आपल्या मागण्यांचे निवदेन घेऊन हजर होते. साहेबांनी त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. मुंबईत गेल्या बरोबर तुमच्या प्रश्‍नावर परिवहन सचिवांची बैठक बोलावतो, तुमचीही बैठक घेऊन प्रश्‍न मार्गी लावू. बैठकीची तारीख तुम्हाला आमदार कल्याण काळे सांगतिल असे आश्‍वासन विलासरावांनी दिले आणि ते मुंबईला जाण्यासाठी निघाले. 

काळी-पिवळी चालकांचा प्रश्‍न सोडवायचा हे त्यांनी पक्‍के ठरवले होते. मुंबईत गेल्यानंतर त्यानी दोन-तीन दिवसांतच परिवहन सचिवांना बोलावून 4 अधिक एकचा परवाना 9अधिक एक करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या. सचिवांनी मी अभ्यास करून सांगतो हे सांगितल्यावर विलासरावांनी अभ्यास करायची गरज नाही, कॅबिनेटमध्ये प्रस्ताव ठेवा नाही तर मीच सही करतो असे म्हणत व्हेकल रिसर्च टेस्टच प्रमाणपत्र द्या अशा सूचना केल्या. 

हा निर्णय घेतला नाही तर काळी-पिवळी चालक ओव्हरसीट भरतील, त्यातून दुर्घटना घडू शकते. त्यापेक्षा जीपच्या क्षमतेनूसार परवाना देऊ. ज्यामुळे आरटीओचा महसुल वाढेल आणि हप्तेखोरीही बंद होईल असा टोला देखील त्यांनी परिवहन सचिवांना लगावला होता. अखेर मंत्रीमंडळाच्या बैठकीत काळी-पिवळी चालकांना दिलासा देत विलासराव देशमुखांनी 9 अधिक एकचा परवाना देण्याचा निर्णय घेतला.

संबंधित लेख