Scuffle between Shivsena BJP in Nagar | Sarkarnama

मिरी-तिसगाव योजनेवरून शिवसेना-भाजपमध्ये राडा

सरकारनामा ब्युरो
रविवार, 28 ऑक्टोबर 2018

मिरी- तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाणी चोरीवरुन शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यात टंचाई आढावा बैठकीत शनिवारी राडा झाला. शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने अधिकारीही गडबडले. 

पाथर्डी : मिरी- तिसगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पाणी चोरीवरुन शिवसेना व भाजपाच्या पदाधिकाऱ्यात टंचाई आढावा बैठकीत शनिवारी राडा झाला. शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी आक्रमक झाल्याने अधिकारीही गडबडले. 

बैठकीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख व जिल्हा परीषदेचे सदस्य अनिल कराळे यांनी मिरी- तिसगाव पाणी योजनेवर असलेले अनाधिकृत असलेले कनेक्शन धारकावर कारवाई करावी, हे कनेक्शन बंद करावेत व करंजीसह टेलच्या गावाला पाणी मिळावे, अशी मागणी केली. कराळे यांनी भाजपाचे पदाधिकारी कोणाच्या घरचे गडी असल्यासारखे काम करतात, असा आरोप केला. याला मिरी- तिसगाव पाणी योजनेच्या समितीचे प्रमुख एकनाथ आटकर यांनी आक्षेप घेतला. कराळे हे पाणी योजनेच्या कामात राजकारण करीत आहेत. सरपंचांनी पाणीपट्टी भरु नये, अशी भुमिका कराळे घेतात, हे चुकीचे आहे, असे सांगितले. यावरुन कराळे व आटकर यांच्यात जोरदार खडांजगी झाली. 

रविंद्र वायकर, विष्णुपंत अकोलकर पुरुषोत्तम आठरे यांनी आटकर यांची बाजु उचलुन धरीत कराळे यांच्या बोलण्याला आक्षेप घेतला. कराळे यांनी भाजपाच्या पदाधिका-यांना जोरदार विरोध केला. सत्तेच्या जिवावर कोणी बोलत असेल, तर जनता माफ करणार नाही. मुठभर पाणी चोरामुळे जनतेला पाणी मिळत नाही, अशी भुमिका कराळे यांनी घेतली. बैठकीत गोंधळ उडाला. अखेर गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी आभार मानले व बैठक संपली, असे जाहीर केले. त्यानंतर अनिल कारळे यांनी तहसीलदारांच्या दालनात बैठक मारली. करंजीला पाणी मिळाले पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन करू असे कराळे यांनी सांगितले. या वेळी पुरुषोत्तम आठरे व कराळे यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमक झाली. पाणी योजनेचे निमित्त असले, तरी आगामी होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण पेटल्याचे दिसून येत आहे.

संबंधित लेख