sayyad matin and owaissy photo | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

अबू आझमींची भेट घेताच सय्यद मतीनसाठी उघडले एमआयएमचे दरवाजे  

जगदीश पानसरे 
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

"मतीन को कित्ती मर्तबा समझाया' म्हणत त्रागा करणाऱ्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद भेटीत मतीन याला गळाभेट देत घर वापसीचे संकेत दिले आहेत. 

औरंगाबादः संकटकाळात पक्षाने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करत समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अबू आझमी यांची भेट घेणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन यांच्यासाठी पक्षाची कवाडे उघडली गेली आहेत. "मतीन को कित्ती मर्तबा समझाया' म्हणत त्रागा करणाऱ्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी औरंगाबाद भेटीत मतीन याला गळाभेट देत घर वापसीचे संकेत दिले आहेत. 

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या शोक प्रस्तावाला विरोध दर्शवत त्यांना श्रध्दांजली वाहण्यास नकार देणारे एमआयएमचे नगरसेवक सय्यद मतीन पक्षाकडून बहिष्कृत करण्यात आले होते. पक्षाला न विचारता हा अगाऊपणा केल्याबद्दल ओवेसी यांनी मतीन यांची चागंलीच खरडपट्टी काढली होती. महापालिकेच्या सभागृहात भाजप नगरसेवकांनी मतीनची धुलाई केल्यामुळे पक्षाची अब्रु गेली अशी भावना स्थानिक नेते व काही नगरसेवकांची झाली होती. 

त्यामुळे मतीन प्रकरणाशी एमआयएमचा काही संबंध नाही, सभागृहात घेतलेली भूमिका त्यांची वैयक्तिक होती असे स्पष्ट करत पक्षाने त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, विविध प्रकारच्या गुन्ह्यांमुळे सय्यद मतीन यांच्यावर पोलीसांनी एमपीएडी कायद्याअंतर्गत कारवाई करून एक वर्ष स्थानबध्द केले होते. 

या कारवाईतून मुक्त करण्यासाठी पक्षाने आपल्याला कायदेशीर मदत करावी अशी मतीन यांची अपेक्षा होती. पण पक्षाने त्याकडे दुर्लक्ष केले. अखेर मतीनने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांना साकडे घातले आणि आझमी यांनी कायदेशीर मदत पुरवत मतीन यांच्या सुटकेत महत्वाची भूमिका बजावली. या ऋणातून उत्तराई होण्यासाठी मतीन याने गेल्या महिन्यात मुंबईत जाऊन अबू आझमी यांचे आभार देखील मानले. 

अबू आझमी यांची भेट घेतल्यामुळे सय्यद मतीन व एमआयएममधील एक नाराज गट समाजवादी पक्षात प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा पक्षात सुरू होती. प्रत्यक्षात घडलेही तसेच सय्यद मतीन वगळता एमआयएममधील पाच महत्वाचे पदाधिकाऱ्यांनी सपात प्रवेश करत पक्षाला धोक्‍याचा इशारा दिला होता. आणखी काही नगरसेवक व पदाधिकारी समाजवादी पक्षाच्या वाटेवर असल्याचे देखील बोलले जाते. 

पक्षातील संभाव्य फाटाफूट टाळण्यासाठी एमआयएमने सय्यद मतीन यांच्या बाबतीत एक पाऊल मागे घेत नरमाईचे धोरण स्वीकारल्याचे दिसते. महापालिकेतील राड्यानंतर सय्यद मतीनसाठी बंद झालेले एमआयएमचे दरवाजे खुद्द असदुद्दीन ओवेसी यांनीच उघडल्याचे स्पष्ट झाले आहे. 

औरंगाबाद येथील जाहीर सभेला उपस्थित राहण्यासाठी ओवेसी आमदार इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी मुक्कामी होती. या दरम्यानच सय्यद मतीन यांनी ओवेंसीची भेट घेत त्यांच्यांशी चर्चा केली. मतीन यांच्या खांद्यावर हात ठेवून हातात हात घेतलेले दोघांचे हसरे फोटो सध्या सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. 

या संदर्भात आमदार इम्तियाज जलील यांच्यांशी संपर्क साधला असता त्यांनी या भेटील दुजोरा दिला. ते म्हणाले, ओवेसी आणि प्रकाश आंबेडकर यांच्या जाहीर सभेसाठी महाराष्ट्रातील पक्षाचे नगरसेवक शहरात आले होते. त्या सगळ्यांनाच ओवेसी यांच्या सोबत फोटो काढण्याची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली होती. त्यात शहरातील नगरसेवकांचा देखील समावेश होता. 

नगरसेवकांच्या आग्रहाखातर ओवेसी यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी प्रत्येक नगरसेवकाला एक मिनिटाचा वेळ देण्यात आला होता. तेव्हा सय्यद मतीन यांनी देखील ओवेसी यांच्या सोबत फोटो काढला. ही भेट केवळ फोटो पुरतीच मर्यादित होती. याचे वेगळे राजकीय अर्थ कुणी काढू नये असे देखील त्यांनी स्पष्ट केले. 

संबंधित लेख