मनाला पटेल तेच करा... आनंदाचे झाड बना...! 

Sayaji Shinde
Sayaji Shinde

कोल्हापूर : स्वतःच्या मनाला पटेल त्याच क्षेत्रात करिअर करा... संघर्ष कुणालाच चुकलेला नाही... ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्यासाठी झपाटून कामाला लागा... नक्कीच एक दिवस आपलाही येतो आणि यशोशिखराची चढाई त्याच आत्मविश्‍वासाने सुरू होते... प्रसिद्ध अभिनेता सयाजी शिंदे संवाद साधत होते आणि त्या संवादातून मिळणाऱ्या सळसळत्या ऊर्जेतून साऱ्यांच्यात नवचेतना जागत होत्या. निमित्त होते, सकाळ माध्यम समूह व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित, डीवायपी ग्रुप प्रस्तुत 'ऊर्जा ः संवाद ध्येयवेड्यांशी' या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या पुष्पाचे. 

दरम्यान, सयाजी शिंदे यांनी तब्बल दीड तास दिलखुलास संवाद साधला. मनाला पटेल तेच करा, असे सांगताना प्रत्येक टप्प्यावर स्वतः आनंद घ्या, दुसऱ्यांना द्या आणि आयुष्यच एक आनंदाचं झाड बनवून टाका, असा मौलिक मंत्रही त्यांनी करिअरिस्ट विद्यार्थ्यांना दिला. आयुष्यातील विविध टक्केटोणपे, त्यावर केलेली मात आणि विविध कविता, अनुभव, संवादांची पेरणी करीत त्यांनी हा संवाद अधिक उंचीवर नेला. योगेश देशपांडे (पुणे) यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

बालपणातील विविध अनुभवांची शिदोरी रीती करताना सयाजी शिंदे यांनी पावसाळ्यात एसटीसाठी तीन मैल आणि उन्हाळ्यात दीड मैल चालत जायला लागण्यापासून ते डोंगरावर जाऊन केलेल्या विविध एक्‍सरसाईजेस आणि तालमींच्या आठवणी शेअर केल्या. 

ते म्हणाले, ''खेड्यातला म्हणजे मागासलेला ही मानसिकता अजूनही आहे. मी साताऱ्यात लोकरंगमंच संस्थेत आल्यानंतरही काही प्रमाणात माझ्याविषयी अशीच मानसिकता होती. पण जे जमत नव्हते, त्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकत असतानाच अभिनेता होण्याचे मनात पक्के ठरवले आणि पुढे मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर कुर्ला नागरी सहकारी बॅंकेत नोकरी मिळाली. पण नोकरी करून नाटकांतून करिअर करायचे असल्याने 'अभिनय साधना', 'भूमिका शिल्प', 'भरतमुनींचे नाट्यशास्त्र' अशा पुस्तकांचा शक्‍य तितक्‍या विस्तृतपणे अभ्यास केला आणि पुढे वाटचाल सुरूच ठेवली. 'झुलवा' नाटक हे मुंबईतले पहिलेच नाटक. या नाटकातील जोगत्याची मुख्य भूमिका माझी. अर्थात नाटकाचा हिरोच मी होतो. या नाटकाला अनेक बक्षिसे मिळाली आणि विविध भूमिका आपणहून येऊ लागल्या.'' 

तेलगू, मल्याळम्‌, तमीळ अशा सात भाषांतील चित्रपटांत भूमिका केल्या. मात्र, त्यासाठीची मेहनत मोठी होती. भाषा येत नाही म्हणून लाजायचे काहीच कारण नाही. जे येत नाही, ते स्पष्टपणे सांगितले की अनेक पर्याय उपलब्ध होतात आणि त्या माध्यमातून आपण ती गोष्ट साध्य करू शकतो, असे सांगताना त्यांनी सुपरस्टार देवानंद, अमजद खान, निळू फुले, वामन केंद्रे यांच्यापासून ते सोनाली कुलकर्णी यांच्यापर्यंत विविध कलाकार, नाटककारांकडून कशी प्रेरणा मिळाली, याचे अनुभवही शेअर केले. प्रकाश होळकर यांच्या 'पाऊसपाण्यामध्ये एकटी नको जाऊ' या कवितेने त्यांच्या संवादाची सांगतेकडे वाटचाल सुरू झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com