सीएम चषक स्पर्धेत सावे - तनवाणींची बॅटिंग; क्‍लीनबोल्ड कोण होणार ?

सीएम चषक स्पर्धेत सावे - तनवाणींची बॅटिंग; क्‍लीनबोल्ड कोण होणार ?

औरंगाबाद : सध्या राज्यभरात सीएम चषकाचे वारे जोरात वाहत आहे. भाजपच्या विद्यमान आमदारांना सीएम चषक स्पर्धेचे आयोजन बंधनकारक तर करण्यात आले आहेच, शिवाय पुन्हा उमेदवारी देण्याचे आश्‍वासन देखील देण्यात आल्याची चर्चा आहे. औरंगाबादेत पूर्व मतदारसंघातील भाजप आमदार अतुल सावे यांनी सीएम चषकाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने विभागीय क्रीडा संकुलात आज सावे आणि भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांच्यात क्रिकेटचा खेळ चांगलाच रंगला. आता आगामी विधानसभा निवडणुकीत नेमकी बॅटिगंची संधी कुणाला मिळते आणि क्‍लीनबोल्ड कोण होणार? हे पाहणे रंजक ठरणार आहे. 

शिवसेना-भाजप या दोन पक्षांची 2014 मध्ये युती नसतांना पुर्व मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे विजयी तर मध्य मतदारसंघातून तनवाणी पराभूत झाले होते. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी दोघांनीही जोरदार तयारी चालवली आहे. सावे यांनी गेल्या वर्षभरात मतदारसंघात आरोग्य शिबीर, जॉब कार्डचे वाटप, बेरोजगारांसाठी मेळाव्याचे आयोजन करत जनसंपर्क वाढवण्यावर भर दिला आहे. सीएम चषकाच्या माध्यमातून त्यांच्या मिशन 2019 च्या मोहिमेला अधिक वेग आला आहे. दुसरीकडे भाजपचे शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी देखील मध्य मतदारसंघात आगामी निवडणुकीत कमळ फुलवायचेच असा निर्धार करत पक्ष प्रवेश, उज्वला गॅस वॉटर, हेल्थ कार्ड, मतदार नोंदणीच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू केली आहे. 

"युती न होवो' ही तर इच्छुकांची इच्छा 
नुकत्याच झालेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये भाजपचा "निक्‍काल' लागला. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या तीनही राज्यातील भाजपची सत्ता गेली. त्यामुळे सध्या भाजपचे शतप्रतिशतचे अवसान गळून पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी " शिवसेनेशी युती संदर्भात लवकरच चर्चा होईल' या विधानवरून ते दिसून आले आहे. पंरतु गेल्या दोन वर्षांपासून दोन्ही पक्षाकडून स्वबळाची भाषा आणि कार्यकर्त्यांना तयारीला लागा असे दिलेले आदेश यामुळे आता "युती न होवो' ही तर "इच्छुकांची इच्छा' अशीच परिस्थिती आहे. 

औरंगाबाद शहरातील पूर्व, पश्‍चिम आणि मध्य या तीनही मतदारसंघांचा विचार केला तर शिवसेना-भाजप इच्छुकांनी बरीच मेहनत घेत मतदारसंघाची बांधणी केली आहे. पुर्वमध्ये शिवसेनेचे राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ, पश्‍चिम मतदारसंघात भाजपचे बाळासाहेब गायकवाड, राजू शिंदे, पंकज भारसाखळे, जालिंदर शेंडगे, तर मध्यतून भाजपचे किशनचंद तनवाणी यांनी बरीच तयारी केली आहे. त्यामुळे नेत्यांच्या युतीच्या निर्णयामुळे यावर पाणी फिरू नये असेच या सगळ्या इच्छुकांना वाटत असावे त्यामुळे सीएम चषकाच्या निमित्ताने मैदानावर उतरून चौकार, षटकार ठोकणाऱ्यांपैकी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कितीजणांना बॅटिंग करण्याची संधी मिळते आणि कोण क्‍लीनबोल्ड होतो हे लवकरच स्पष्ट होईल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com