save and job card for youth | Sarkarnama

औरंगाबाद पूर्वमध्ये अतुल सावे यांना "जॉबकार्ड' यश देणार का ?

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : शहरातील पूर्व विधानसभा मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपचे कमळ फुलवण्यासाठी विद्यमान आमदार अतुल सावे सध्या झपाट्याने कामाला लागले आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात मतदारसंघात आरोग्य शिबीर घेतल्यानंतर आता त्यांनी आपला मोर्चा बेरोजगार तरूणांकडे वळवला आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी जॉबर्काडच्या माध्यमातून त्यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आता पूर्वमध्ये अतुल सावेंचे "कार्ड' चालणार का हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

अतुल सावे यांनी 29 जुलै रोजी मतदारसंघात भव्य बेरोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. शहरात अनेक तरुणांच्या हाताला आज काम नाही. अनेक व्यवसाय, उद्योगांमध्ये होतकरू तरुणांची गरज आहे, पण केवळ माहिती नसल्यामुळे ही संधी त्यांना मिळत नाही. तेव्हा सुशिक्षित बेरोजगार तरूणांना नोकरी मिळावी यासाठी मार्गदर्शन आणि जॉब कार्ड वाटप यावेळी करण्यात आले. या मोहिमेअंतर्गत 692 कंपन्यांमध्ये रिक्त असलेल्या तब्बल 30 हजाराहून अधिक नोकऱ्या तरूणांना उपलब्ध करून देण्याचा अतुल सावे यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. ज्या तरूणांकडे हे जॉबकार्ड असेल त्याला वर्षभर एसएमएसच्या माध्यमातून कोणत्या कंपनीत, कुठल्या प्रकारचा जॉब आहे, मुलाखत आदी विषयाची माहिती मिळणार आहे. 

संपूर्ण शहरातून आलेल्या तरुणांची या जॉबकार्ड वाटप कार्यक्रमांत मोठी गर्दी झाली होती. असाच आणखी एक कार्यक्रम अतुल सावे यांच्यावतीने मतदारसंघातील दुसऱ्या भागात देखील घेण्यात येणार आहे. बेरोजगारांच्या प्रश्‍नाला हात घालत अतुल सावे यांनी आगामी विधानसभा निवडणूक तयारीच्या दिशेने पाऊल टाकल्याचे दिसते. 
1990 ते 2014 दरम्यान झालेल्या सहा निवडणुकांपैकी सर्वाधिक म्हणजे चारवेळा पूर्वमधून भाजपने विजय मिळवलेला आहे. तर दोनदा कॉंग्रेस उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली होती. 2014 मध्ये शिवसेना-भाजप स्वतंत्र लढल्यानंतरही भाजपने अतुल सावे यांच्या रुपाने पूर्वची जागा आपल्याकडे राखण्यात यश मिळवले होते. 

आगामी विधानभा निवडणुकीत सेना-भाजप पुन्हा एकमेकांच्या समोर उभे ठाकण्याची शक्‍यता असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे. शिवसेना, एमआयएम आणि कॉंग्रेस या प्रमुख पक्षांना टक्कर देऊन विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मतदारसंघात कोट्यावधींच्या रस्त्यांची कामे केल्याचा दावा करत भाजपकडून पुन्हा एकदा "सबका साथ सबका विकास'चा नारा दिला जाणार आहे. 

परंतु गेल्या साडेतीन वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. राज्यात सध्या आरक्षणाच्या मुद्यावरून भाजपविरोधात रान पेटलेले आहे. अशावेळी केवळ विकासाच्या घोषणा करून चालणार नाही तर प्रत्यक्ष कामही दाखवावे लागेल याची जाणीव झाल्यामुळे अतुल सावे यांनी बेरोजगारीच्या प्रश्‍नाला हात घातल्याची चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख