Satyjitsingh Patankar vs Shambhuraje Desai | Sarkarnama

दोन वेळा लाटेवर निवडून आलेल्यांनी सहा वेळा निवडून आलेल्यांचा नाद करू नये  :  पाटणकर  

सरकारनामा
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

शेजारचे कारखाने दहा हजार मेट्रिक टनासह पूरक प्रकल्पांनी सज्ज झाले. या बहाद्दरांनी मात्र गाळप क्षमता एका टनानेही वाढवली नाही. त्यानंतर चालू 17 उपसा जलसिंचन योजना बंद पाडल्या.

पाटण (जि. सातारा) : " पाटण तालुक्‍याचे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई आपण पक्षाशी, नेत्यांशी एकनिष्ठ आहात तर अयोध्येला का गेला नाहीत?  तुम्हाला तिकडे कोणीच बोलावलेच नाही का ?  "असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी केला आहे

मोरगिरी (ता. पाटण) विभागातील संपर्क दौऱ्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सत्यजितसिंह पाटणकर बोलत होते. या वेळी सुनील मोरे, संदीप कोळेकर, हिंदूराव शिर्के, विकास सुर्वे आदी उपस्थित होते. 

पाटणकर म्हणाले, " शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, सामान्य शिवसैनिकदेखील राममंदिर व्हावे म्हणून आयोध्येला गेले. तालुक्‍यातील शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई येथेच आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्याविषयी बेताल वक्तव्य करीत बसले आहेत, यावरून ते किती कट्टर शिवसैनिक व त्यांची पक्षनिष्ठा, संस्कारही स्पष्ट झाले आहेत.'' 

"तालुक्‍याला यापूर्वी 28 वर्षे मंत्रिपद मिळाले. त्यापैकी तेवीस वर्षे लोकनेते बाळासाहेब देसाई व पाच वर्षे विक्रमसिंह पाटणकर यांना संधी मिळाली. मात्र, लोकनेत्यांविषयी भाष्य करताना पाटणकर यांनी कधीही बेताल वक्तव्य केले नाही. एकदा सहकार परिषद अध्यक्षपदाचा दिवा मिळवला आणि त्याचा आमदार देसाई यांनी तालुक्‍यात कसा भोंगा वाजवला, हे जगजाहीर आहे. त्यामुळे दोन वेळा लाटेवर निवडून आलेल्यांनी सहा वेळा निवडून आलेल्या विक्रमसिंह पाटणकर यांची मापे काढण्याअगोदर स्वतःचे कर्तृत्व तपासून पाहावे,'' असा टोलाही त्यांनी लगावला. 

"लोकनेते शिवाजीराव देसाई व विक्रमसिंह पाटणकर यांनी एकत्रितपणे साखर कारखान्याची निर्मिती केली. तो कारखाना शंभूराज देसाई यांच्या ताब्यात गेल्यापासून येथे नवा कोणताही प्रकल्प उभा राहिलाच नाही. शेजारचे कारखाने दहा हजार मेट्रिक टनासह पूरक प्रकल्पांनी सज्ज झाले. या बहाद्दरांनी मात्र गाळप क्षमता एका टनानेही वाढवली नाही. त्यानंतर चालू 17 उपसा जलसिंचन योजना बंद पाडल्या. गांधीटेकडीसारखी आशिया खंडातील एक क्रमांकाची योजना सहा हजार एकर क्षेत्रावरून अवघ्या 300 एकरवर आणण्याचा विक्रम करणारे आमदार देसाई हे विक्रमसिंह पाटणकर यांच्या कार्याची मापे काढतात यापेक्षा मोठा विनोद कोणता,'' असे पाटणकर यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख