नेत्यांच्या गर्विष्ठपणाचा कॉंग्रेसला फटका : सत्यजित तांबे

नेत्यांच्या गर्विष्ठपणाचा कॉंग्रेसला फटका : सत्यजित तांबे

नगर  : कॉंग्रेसच्या काही नेत्यांमध्ये गर्विष्ठपणा वाढला होता. त्यातच आघाडी सरकारच्या काळात मित्रपक्षांच्या नेत्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचाही फटका बसला. त्यामुळे कॉंग्रेसविषयी नाराजी वाढल्याने नागरिकांनी सरकार बदलण्याचा निर्णय 2012मध्येच घेतला होता. ही जनभावना नरेंद्र मोदी यांनी "कॅश' केली. त्यात जनहिताच्या त्यांनी केलेल्या घोषणांचा परिणाम म्हणून कॉंग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले, अशी कबुली युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली.

मोदी सरकारच्या निर्णयांमुळे भारताची अर्थव्यवस्था कधी नव्हे, ती प्रचंड कठीण स्थितीतून जात असल्याची चर्चा जगभर सुरू झाली आहे. वाढती महागाई, घटलेला रोजगार व शेती उत्पादन, भरडलेला व्यापारी, बंद अवस्थेकडे चाललेल्या उद्योगामुळे जनतेत रोष वाढलेला आहे. तो रोष आता 2019च्या निवडणुकांत दिसेल, असे मत तांबे यांनी व्यक्त केले.

तांबे यांनी वाढदिवसानिमित्त देशाची व राज्याची अर्थव्यवस्था, घटता रोजगार, महागाई आदी मुद्यांवर स्पष्ट मते व्यक्त केली. ते म्हणाले, की विकासाचा समतोल राखण्यासाठी मुंबई-अहमदाबादसारख्या बुलेट ट्रेनची आवश्‍यकता आहेच. त्याला कोणी विरोध करूही नये. मात्र, या निर्णयाचा हेतू स्वच्छ नाही. मुंबई महाराष्ट्राची आर्थिक राजधानी आहे. येथील व्यापारउदीम अहमदाबादकडे सरकविण्याचा त्यांचा हेतू लपून राहत नाही. त्यातून मुंबईतील अर्थव्यवस्था भविष्यात कोलमडल्याशिवाय राहणार नाही. दुसरीकडे मुंबई-नागपूर समृद्धी मार्गाचे काम गतीने सुरू आहे. त्यामुळे नागपूर विकासाचे दुसरे केंद्र करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचाही हेतू लपून राहत नाही. नागपूर विकसित व्हावेच, परंतु त्यातूनही मुंबई खाली करण्याचा त्यांचा हेतू स्पष्टपणे दिसतो. त्यामुळे मोदी-शहांसाठी अहमदाबाद आणि फडणवीस-गडकरींसाठी नागपूर विकसित करताना मुंबईची ससेहोलपट होईल. ती होऊ नये, अशी अपेक्षा असल्याचे तांबे म्हणाले. 

सरकारच्या ध्येय-धोरणांवर सोशल मीडियातून व्यक्त होणाऱ्यांची सरकार मुस्कटदाबी करत असल्याचे नुकतेच स्पष्ट झाले. अलीकडेच सोशल मीडियातून सरकारवर बोलणाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावली. यापूर्वी सोशल मीडियातून कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यावरही अगदी खालच्या पातळीवर टीका करण्यात आली. तथापि, त्या वेळी सत्ता असूनही कधीच अशा लोकांची मुस्कटदाबी झाली नाही. आता तर सरकारवर बोलणाऱ्या इलेक्‍ट्रॉनिक माध्यमांचे संपादक, पत्रकारांनाही सरकार टार्गेट करते. त्यामुळे अशा सर्वच सरकारी यंत्रणेच्या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून राज्यभर प्रयत्न करण्यात येणार आहे. गरज भासल्यास त्यासाठी कायद्याचाही आधार घेतला जाईल, असे ते म्हणाले. 

कर्जमाफीतून शेतकऱ्यांची फसवणूक..!
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करणार, अशी घोषणा एकीकडे मुख्यमंत्री करतात आणि दुसरीकडे त्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या अर्जांची अजून छाननीच झाली नसल्याचे मंत्री सांगतात. त्यामुळे कर्जमाफी घोषणा शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक आहे. 60 लाख शेतकऱ्यांना 35 हजार कोटींची कर्जमाफी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात आधार लिंक नसल्याची कारणे देऊन अडीच लाखांवर शेतकऱ्यांची नावे वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे कर्जमाफीबाबत ही केवळ टाळाटाळ आहे, असेच म्हणता येईल, असे ते म्हणाले. 

पंचवीस हजार तरुणांना रोजगार देणार
रोजगार मिळत नसल्याने तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. तिकडे कोणाचे लक्षच नाही. म्हणून जयहिंद युवा मंचतर्फे यूथ एन्क्‍युबेशन सेंटर (उद्योजकता विकास केंद्र) उद्या वाढदिवसानिमित्त सुरू करत आहोत. त्याचा प्रारंभ नगर जिल्ह्यातून होईल. त्यात आगामी पाच वर्षांत पाचशे उद्योजक घडविण्याचे व त्यातून आणखी पंचवीस हजार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे टार्गेट आहे. यात उद्योजक घडविण्यासाठी पाच लोकांची विशेष समिती असेल. त्यात दोन उद्योजक व प्रत्येकी एक सीए, वकील व निवृत्त सरकारी अधिकाऱ्याचा समावेश असेल. बहुतांश वेळा तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रथम घरातूनच विरोध असतो. तो कमी करून तरुणांना उद्योगाची क्षेत्रे, त्यासाठी असलेल्या सरकारी सवलती, फंडिंग यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच उद्योग सुरू करणाऱ्या तरुणास मदत म्हणून दर चार महिन्यांनी त्याच्या उद्योगाचा आढावा, त्यातील त्रुटी व मार्गक्रमण करण्यासाठी नव्या उपाययोजनांवर समिती काम करणार असल्याचे तांबे यांनी सांगितले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com