सोडलेला बाण सत्यजीतवर उलटणार ?

सोडलेला बाण सत्यजीतवर उलटणार ?

नगर : देशातील सर्वोच्चपद असलेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत फुटलेल्या मतांमध्ये नगर जिल्ह्यातील कॉग्रेस व राष्ट्रवादीमधील दोन आमदार असल्याचे ट्विटरद्वारे सांगून युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी नवा वाद उपस्थित केला आहे. कॉग्रेसमध्येच राहून कॉग्रेसमधील नेत्यांवर भरोसा नसल्याचे त्यांनी अधोरेखित केल्याने पक्ष त्यांना कसा जाब विचारतो, याकडे आता जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. 

पक्षाला घरचा आहेर 
कॉग्रेसमधीलच एका आमदारावर व मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसमधील एका अशा दोन आमदारांवर सत्यजीत यांच्या संशयाची सुई जाते. ते स्वतः ज्या पक्षात आहेत, त्याच पक्षाला घरचा आहेर, त्यांना महागात पडण्याची शक्‍यता आहे. त्यात आता कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही, सत्यजीत मोठा, मी छोटा - असा उपरोधात्मक टोला लगावल्याने पक्षाकडून कारवाईची शक्‍यता बळावू लागली आहे. 

मामाच्या संघर्षाला भाच्याकडून बळ 
नगर जिल्ह्यात कॉग्रेसमधील अंतर्गत धुसफूस सर्वश्रूत आहे. पक्षाचे प्रमुख नेते असलेले व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आमदार बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वादातून आतापर्यंत अनेकदा एकमेकांवर राजकीय बाण सोडले गेले आहेत. पेटलेला हा वाद कोणत्या स्तरावर जाणार, हे निश्‍चित नसतानाच विखे पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याविषयीच्या चर्चेने विखेंबरोबर कोण कोण जाणार, हाही विषय चर्चिला. त्यातच थोरातांना मानणारा गट आपोआप पक्षनिष्ठेच्या गप्पा मारू लागला. ही धुसफूस चालू असतानाच थोरात यांचे भाचे व आमदार डॉ. सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेले ट्विट कॉग्रेसचे नेते विखे पाटील व राष्ट्रवादीच्या एका आमदाराकडे रोख ठेवत केले, असे मानले जाते. त्यामुळे विखे- थोरात यांच्यातल्या वादाच्या आगीत नवीन वाद उभा करून तेल ओतून भडका अधिक वाढविल्याची भावना दोन्ही गटांतील कार्यकर्त्यांची झाली आहे. 

सोशल मिडियाचा वापर 
भारतीय जनता पक्षाने सोशल मिडियाचा वापर करून निवडणुकांत बाजी मारली, हे सर्वश्रूत आहे. त्यामुळे बहुतेक राजकीय नेते सोशल मिडियाचा अति वापर करताना दिसत आहेत. त्यातच सत्यजीत तांबे हे पक्षसंघटनेसाठी सोशल मिडियाचा भरपूर वापर करतात. त्यांनी परदेशातून केलेले ट्विट कोणता उद्देश ठेवून केले, हा वेगळा विषय असला, तरी देशाच्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीबाबत उपस्थित केलेला आरोप असल्याने त्याची चौकशी लावण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होतील, यात शंकाच नाही. त्यामुळे सोशल मिडियाचा वापर त्यांना महागात पडतो, की फायदेशीर होते, हे काळच ठरविणार आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com