Sattar intensifies Political battle between Raosaheb Danve & Arjun Khotkar | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

रावसाहेब दानवें - अर्जुन खोतकर महायुद्धाच्या भडक्यात आमदार सत्तारांचे तेल

जगदीश पानसरे 
मंगळवार, 4 सप्टेंबर 2018

सत्तार यांनी तर रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय डोक्‍यावर केस उगवू देणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाच घेतली आहे. अर्जूनाच्या बाणाने दानवेंचा वध करणारच असे सत्तार यांनी वारंवार जाहीरपणे सांगितले आहे. 

औरंगाबादः जालन्याचे शिवसेना आमदार तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स व्यवसाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यातील राजकीय महायुद्ध दिवसेंदिवस भडकातच चालले असून काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तर त्यात तेल ओतण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत . 

शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना सिल्लोड मतदारसंघात पुन्हा एकदा कॉंग्रेसच्या व्यासपीठावर दिसले. सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राचे वाटप नुकतेच त्यांच्या हस्ते करण्यात आले. सिल्लोड-सोयगावचे कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी याच कार्यक्रमाच्या शुभारंभासाठी देखील अर्जून खोतकर यांना आंमत्रित केले होते. आता मंजुरी पत्रांचे वाटप देखील खोतकरांनीच करावा असा आग्रह सत्तारांनी धरला आणि 'तुमने बुलाया और हम चले आये' म्हणत खोतकर आले. 

आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार हे जवळपास निश्‍चित झाले आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अर्जून खोतकर यांना मैदानात उतरवण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली असल्याचे बोलले जाते. 

रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून सलग चारवेळा विजयी झाले आहेत. त्यांना पराभूत करणे सोपे नाही याचा अंदाज आल्यामुळेच शिवसेनेने कॉंग्रेसशी सलगी वाढवल्याची जिल्ह्यात चर्चा आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी खोतकर यांनी कॉंग्रेसची मदत घेत मैत्रीचा अध्याय सुरू केलाच होता. आता शिवसेना-कॉंग्रेसमधील हे मैत्रीचे संबंध वृध्दींगत होणार असे दिसते. 

जालना लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार आणि जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्यात बिनसल्याची चर्चा या निमित्ताने दोघांचेही समर्थक करतांना दिसतात. 

सत्तार यांनी तर रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणुकीत पराभूत केल्याशिवाय डोक्‍यावर केस उगवू देणार नाही अशी भीष्म प्रतिज्ञाच घेतली आहे. अर्जूनाच्या बाणाने दानवेंचा वध करणारच असे सत्तार यांनी वारंवार जाहीरपणे सांगितले आहे. 

यावर सिल्लोड नगर परिषदेच्या कार्यक्रमात अर्जून खोतकर यांनी संदर्भ देत "रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्या डोक्‍यावरच्या केसांची काळजी करू नये, त्याची जबाबदारी आता मी घेतली आहे' असा टोला लगावत भविष्यात काय घडेल याचा ट्रेलर दाखवला. आता अर्जूनाचा बाण आणि त्याला कॉंग्रेसचा हात असे समीकरण आगामी लोकसभा निवडणूकीत जुळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

दानवे-खोतकर टक्कर अटळ? 

गेल्या वर्षभरात रावसाहेब दानवे आणि अर्जून खोतकर यांच्या अनेकदा खटके उडाले. नगर परिषदे अंतर्गत झालेल्या विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमांत डावलने, एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप, मुंबईत भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीत मातोश्रीवर जाण्यापासून दानवेना रोखणे या कारणांमुळे या दोन नेत्यांमधील दरी अधिकच रुदांवली. 

अर्जुन खोतकर आणि कॉंग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील जवळीकीवर रावसाहेब दानवे बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे त्यांचे समर्थक सांगतात. तीनशे मतांनी निवडूण येणारे खोतकर माझा पराभव करू शकत नाहीत असा दावा देखील दानवे यांनी वेळोवेळी केला आहे. खोतकरांमध्ये हिमंत असेल तर त्यांनी शिवसेनेकडूनच माझ्या विरोधात लढावे असे आव्हान देतांनाच खोतकर कॉंग्रेसमध्ये जाणार असल्याचा गौप्यस्फोट दानवे यांनी यापुर्वीच केला आहे. 

आमदार अब्दुल सत्तार यांच्या बोलावण्यावरून वेळोवेळी कॉंग्रेसच्या व्यासपीठावर खोतकरांनी लावलेली हजेरी यामुळे त्यांच्या आरोपात तथ्य असल्याचा दावा दानवे समर्थकांकडून केला जातोय. तर दुसरीकडे स्वबळावर लढणाऱ्या शिवसेनेचे जालना लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार म्हणून खोतकरांकडे बघितले जाते. 
त्यामुळे थेट कॉंग्रेसकडून न लढता देखील सत्तार यांची मदत लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अर्जून खोतकरांनाच मिळणार अशी जोरदार चर्चा आहे. 

1195 ते 2009 या पंधरा वर्षात सिल्लोड-सोयगांव विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद होती. त्यामुळे इथून सातत्याने भाजपचे उमेदवार विजयी झाले. पण 2009 आणि 2014 च्या सलग दोन विधानसभा निवडणुकीत इथे कॉंग्रेसच्या अब्दुल सत्तार यांनी विजय मिळवला. 

भाजपचा बालेकिल्ला अचानक कॉंग्रेसकडे गेल्यामुळे सत्तार आणि दानवे यांच्यात सेटिंग होती असा आरोप देखील कॉंग्रेस आणि भाजप समर्थकांकडून केला जात होता. जालना लोकसभेसाठी मदत करण्याच्या बदल्यात सिल्लोडमध्ये कुमकूवत उमेदवार देऊन भाजपने त्याची परतफेड करायची असा अलिखित करार या दोन नेत्यांमध्ये होता असे बोलले जाते. 

पण गेल्या वर्षभरापासून सत्तार-दानवे एकेमकांना पाण्यात पाहत आहेत. आगामी निवडणुकीत सिल्लोडचा आमदार भाजपचा असेल असा दावा रावसाहेब दानवेंकडून केला जातोय, तर दानवे-पिता पुत्रांना पराभूत करण्याचा विडा कॉंग्रेसच्या सत्तार यांनी उचलला आहे. आता कुणाचा दावा खरा ठरतो हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल. की पुन्हा दानवे विरोधकांना चकवा देण्यात यशस्वी ठरतात हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

 

संबंधित लेख