औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसमध्ये आता सत्तार पिता पुत्राची "दुहेरी सत्ता'

 औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसमध्ये आता सत्तार पिता पुत्राची "दुहेरी सत्ता'

औरंगाबाद : जिल्ह्यात शहर, ग्रामीण युवक कॉंग्रेस अध्यक्षपदासह अन्य पदांसाठी येत्या 9 ते 11 सप्टेंबर दरम्यान निवडणुका होत आहेत. औरंगाबाद जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस अध्यक्षपदासाठी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार मैदानात उतरले आहेत. विदेश दौऱ्यावर रवाना होण्यापुर्वीच अब्दुल सत्तार यांनी मुलाच्या विजयासाठीची फिल्डींग लावल्यामुळे समीर यांचा विजय निश्‍चित समजला जात आहे. वडील जिल्हाध्यक्ष आणि मुलगा ग्रामीणचा अध्यक्ष झाल्यास औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेसवर खऱ्या अर्थाने "सत्तार'गिरी चालणार अशी चर्चा सुरू झाली आहे. 

औरंगाबाद युवक कॉंग्रेस शहर, ग्रामीण अध्यक्ष, महाराष्ट्र प्रेदश युवा उपाध्यक्ष, महासचिव आदी पाच पदांसाठी जिल्ह्यात निवडणुक प्रक्रिया राबवण्यात येत आहे. दोन महिन्यापुर्वी अखिल भारतीय कॉंग्रेक कमिटीकडून पाठवण्यात आलेल्या निरीक्षकांच्यानुसार युवा कॉंग्रेसच्या तरुण मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. आमदार अब्दुल सत्तार यांनी मुलगा समीर याला राजकारणात आणत थेट सिल्लोड नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी बसवले होते. यापुर्वी सत्तार यांच्या पत्नीने देखील नगराध्यक्षपद भूषवले होते. त्यामुळे सत्तार यांच्याकडून राजकारणात घराणेशाही सुरू असल्याची चर्चा देखील त्यांचे विरोधक करतात. पण त्यांना विरोध करण्यास कुणीही धजावत नाही. 

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत सत्तार यांनी आता आपल्या मुलाला सिल्लोड नगर परिषदे पुरतेच मर्यादित न ठेवता त्याला जिल्हा कॉंग्रेसमध्ये सक्रीय करण्याचा निर्णय घेतला आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने जर उमेदवारीची माळ गळ्यात टाकली, तर सिल्लोडमधून मुलाला आमदार करण्याचे देखील अब्दुल सत्तार यांचे नियोजन आहे. त्यासाठीच जिल्हा ग्रामीण युवक कॉंग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणूकीत मुलाला उतरवत संपुर्ण जिल्हा कॉंग्रेसवर आपले वर्चस्व राखण्याचा अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. 

सध्या औरंगाबाद जिल्हा कॉंग्रेस कमिटीमध्ये शहर व जिल्हाध्यक्ष ही दोन स्वतंत्र पद असली तरी सगळी सुत्र ही अब्दुल सत्तार यांनी आपल्याच हातात घेतल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. शहराध्यक्ष नामदेव पवार यांच्याशी सत्तार याचे किती सख्य आहे हे आंदोलनातील त्यांच्या दुराव्यातून अनेकदा स्पष्ट झाले आहे. अशावेळी जिल्हा कॉंग्रेस आपल्या ताब्यात ठेवण्यासाठीच सत्तार यांनी मुलाला ग्रामीण युवक अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतवरले अशी कुजबूज पक्षात सुरू झाली आहे. 

प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचे खंदे समर्थक आणि मर्जीतले म्हणून अब्दुल सत्तार ओळखले जातात. त्यामुळे जिल्ह्यात सत्तार यांचा शब्दच प्रमाण मानला जातो. त्यामुळे समीर सत्तार यास जिल्हा यवुक कॉंग्रेस ग्रामीणचा अध्यक्ष करणे त्यांना अवघड नाही. अगदी युवा मतदारांच्या नोंदणीपासूनच सत्तार यांनी मुलाला निवडून आणण्यासाठीचे नियोजन केले आहे. 

चार सप्टेंबर रोजी अब्दुुल सत्तार विदेश दौऱ्यावर गेले आहेत. ते 13 रोजी परत येणार आहेत. दरम्यान 9 ते 11 सप्टेंबरला जिल्हा युवक कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांच्या निवडणूकीसाठी मतदान आणि लगेच मतमोजणी होणार आहे. त्यामुळे सत्तार जरी विदेशात असले तरी त्यांचे समर्थक समीर सत्तार यांच्यासाठी जोर लावणार आणि त्यांना निवडूण आणणार असे दिसते. 

समीर यांची निवडणूक निशाणी मिर्ची आहे. त्यामुळे ते निवडून आले तर पक्षातील सत्तार विरोधकांना मात्र मिरची झोंबल्याशिवाय राहणार नाही एवढे मात्र निश्‍चित. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com