sattar and khotkar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

खोतकर शिवबंधन तोडून दानवेंना देणार आव्हान ? सत्तारांशी झाली गुप्त चर्चा

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 14 मार्च 2019

औरंगाबाद : जालना लोकसभा मतदारसंघातून कॉंग्रेसचा उमेदवार कोण ? याचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. आमदार अब्दुल सत्तार, डॉ. कल्याण काळे यांच्या नावांची चर्चा घडवून आणत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या विरोधात कॉंग्रेस अर्जुनास्त्राचाच वापर करणार असल्याची जोरदार चर्चा इथल्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. औरंगाबाद येथे सत्तार आणि खोतकर यांच्यात गुप्त बैठक झाली असून कुठल्याही क्षणी खोतकरांचा कॉंग्रेस प्रवेश आणि जालन्यातून त्यांच्या उमेदवारीची घोषणा होऊ शकते असे बालले जाते. 

रावसाहेब दानवे यांच्या विरोधात मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्या अशी मागणी अर्जुन खोतकरांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र युती झाल्यामुळे ती शक्‍यता मावळली. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उध्दव ठाकरे यांची मातोश्रीवर जागावाटपासंदर्भात चर्चा होऊन यादी निश्‍चित झाल्याचे बोलले जाते. या यादीत जालन्यातून खासदार दानवे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून अर्जुन खोतकर यांना सबुरीने घेण्याचा सल्ला देण्यात आल्याचे समजते. 

अर्जुन खोतकर यांनी जालन्यातून लढावेच या मागणीसाठी जिल्ह्यातील शिवसैनिकांनी त्यांच्या निवासस्थानी ठिय्या देत आत्महत्येचा इशारा दिला होता. शिवसैनिकांच्या तीव्र भावना, दोन वर्षांपासून मतदारसंघात सुरु केलेली निवडणुकीची तयारी यामुळे खोतकर देखील लोकसभा लढवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. उद्धव ठाकरेंचा आदेश आपण पाळू असे जाहीर केल्यानंतरही आता खोतकरांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. 

सत्तार-खोतकर यांच्यात गुफ्तगू .. 
कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी बुधवारी (ता.13) औरंगाबादेतील पत्रकार परिषदेत जालना लोकसभा मतदारसंघातून माझे आणि डॉ. कल्याण काळे यांचे नाव चर्चेत असल्याचे सांगितले होते. दोघांपैकी पक्ष ज्याला सांगेल तो निवडणूक लढवेल आणि दानवेंचा पराभव करील असा दावा त्यांनी केला होता. हे सांगतानाच अर्जुन खोतकरांविषयीच्या प्रश्‍नावर त्यांनी " एकदा सुटलेला बाण लक्ष्य वेधूनच परत येत असतो ' असे सूचक विधान केले होते. दुसऱ्याच दिवशी अर्जुन खोतकर आणि अब्दुल सत्तार यांची शहरात गुप्त बैठक झाली. याबैठकीत पुढील वाटचाली संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे. 

महाराष्ट्रातील कॉंग्रस उमेदवारांची यादी दोन दिवसांत जाहीर होण्याची शक्‍यता आहे. या पार्श्‍वभूमीवर खोतकर - सत्तार यांची झालेली भेट पुढच्या धक्कातंत्राची नांदी तर नाही ना ? सत्तार-काळेंची चर्चा घडवून आणायची आणि ऐनवेळी जालन्यातून अर्जुन खोतकरांची उमेदवारी जाहीर करायची अशी रणनीती कॉंग्रेसकडून आखली गेल्याचेही बोलले जाते. दोन दिवसांत तुम्हाला गुड न्यूज कळेल हे सत्तार यांनी केलेले विधान त्यासाठी बोलके ठरू शकते ? 
 
संबंधित लेख