sattar and congress in aurangabad | Sarkarnama

जनतेसाठी संघर्ष की कॉंग्रेसचा स्वतःसाठी संघर्ष, गर्दी कमी झाल्याचे खापर सत्तार यांच्यावर फुटणार का ?

जगदीश पानसरे
शुक्रवार, 2 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : कॉंग्रेसच्यावतीने राज्यातील भाजप-सेना युती सरकारच्या विरोधात मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. औरंगाबादेतील गर्दीचे अनेक विक्रम नावावर असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला. पण अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे हा जनसंघर्ष आहे की कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. 

औरंगाबाद : कॉंग्रेसच्यावतीने राज्यातील भाजप-सेना युती सरकारच्या विरोधात मराठवाड्यात जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. औरंगाबादेतील गर्दीचे अनेक विक्रम नावावर असलेल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर कॉंग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला. पण अपेक्षित गर्दी न जमल्यामुळे हा जनसंघर्ष आहे की कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठीचा संघर्ष असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही. 

युती सरकारला चार वर्ष पूर्ण झाली आणि कॉंग्रेसने फसवणुकीची चार वर्ष अशी निर्भत्सना करत हे सरकार घालवण्यासाठी घंटानाद केला. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जून खरगे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नसीम खान आदी नेते जनसंघर्ष यात्रेच्या समारोपासाठी शहरात दाखल झाले होते. 

जिल्ह्यातील सिल्लोड, फुलंब्री या विधानसभा मतदारसंघात अशोक चव्हाण यांच्या सभा घेऊन जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी आपले राजकीय वजन वाढवले. या सभांना गर्दी देखील चांगली झाली. त्यामुळे मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरील सभा रेकॉर्डब्रेक होणार असा दावा सत्तार आणि त्यांच्या समर्थकांकडून केला जात होता. 

राज्यसभेतील खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना खास समारोपाच्या सभेसाठी आग्रह करून बोलावण्यात आले होते. अशोक चव्हाण यांचे लाडके अब्दुल सत्तार यांच्या आग्रहाखातर चव्हाणांनी दिल्लीतील नेत्यांना गळ घातली. जनआक्रोश सभेच्या समारोपाला बोलावले देखील, पण सांस्कृतिक मंडळावरील रिकाम्या खुर्च्या आणि जेमतेम चार-पाच हजारांची गर्दी पाहून सगळ्याच नेत्यांचा मुड गेला. 

मराठवाड्याच्या विविध भागात जनसंघर्ष यात्रेला झालेली गर्दी आणि त्यावरून सरकारच्या विरोधात जनतेत प्रचंड रोष असल्याचे भासवण्यात कॉंग्रेसचे नेते यशस्वी झाले होते. या सगळ्यावर मराठवाड्यातील समारोप सभेत "सौ सोनार की एक लोहार की' लगावण्याचा अब्दुल सत्तार यांचा प्रयत्न होता. यासाठी गेली दीड महिना सत्तार व त्यांचे कार्यकर्ते जिल्हाभरात मेहनत घेत होते. पण सभेतील रिकाम्या खुर्च्यांमुळे त्यांच्या या मेहनतीवर पाणी फिरले असेच म्हणावे लागेल. तालुका आणि ग्रामीण भागात सभेला जमणारी गर्दी पाहून उत्साहीत झालेल्या सत्तार यांनीच मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर समारोपाची सभा घेण्याचा आग्रह धरला होता. 

पण अर्ध्याहून अधिक मैदान रिकामे राहिल्यामुळे हा डाव त्यांच्यावरच उलटल्याचे बोलले जाते. त्यातही सभेला जी काही गर्दी जमली होती त्यातील निम्मी सत्तार यांच्या सिल्लोड-सोयगांव मतदारसंघातीलच होती हे विशेष. त्यामुळे सरकारच्या विरोधात काढण्यात आलेली जनसंघर्ष यात्रा जनतेची होती की कॉंग्रेसच्या अस्तित्वासाठी अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 

वादाचे पडसाद उमटले? 

जनसंघर्ष यात्रेच्या निमित्ताने शहारात दाखल होताच कॉंग्रेसला जायकवाडीच्या पाणी प्रश्‍नावरून शेतकरी व राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील त्यानंतर पुन्हा कुठेच दिसले नाही. पृथ्वीराज चव्हाण देखील तालुक्‍यातील सभांना हजर न राहता थेट समारोपाच्या सभेतच दिसले. सभेला गर्दी न जमण्या मागे कॉंग्रेसचे विधान परिषदेतील आमदार सुभाष झांबड आणि जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यातील वाद हे देखील एक कारण असल्याचे बोलले जाते. 

लोकसभा उमेदवारीच्या कारणावरून सध्या सत्तार-झांबड यांचा कलगीतुरा जिल्ह्यात चांगलाच गाजतोय. त्यामुळे यल्गार यात्रेत हिरारीने सहभागी झालेले झांबड ऐनवेळी गायब झाले. समारोपाच्या सभेकडे फिरकू नका असे निरोप त्यांनी वैजापूर तालुक्‍यातील आपले समर्थक व शहरातील कार्यकर्त्यांना दिल्याची चर्चा आहे. त्यामुळे अंतर्गत वाद, कुरघोडीचे राजकारण याचा फटका जनसंघर्ष यात्रेच्या समारोप सभेला बसला. जनसंघर्ष यात्रेच्या समारोपाची सभा यशस्वी झाली असती तर त्याचे श्रेय अर्थातच जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांनी घेतले असते. आता फ्लॉप झालेल्या सभेचे खापर देखील त्यांच्याच माथी फुटणार एवढे मात्र निश्‍चित. एकंदरित नेत्यांची रटाळ भाषणे, तेच ते मुद्दे यामुळे कॉंग्रेसची सभा सपशेल फसली. 

दोन ऑक्‍टोबर रोजी शहरातील जांबिदा मैदानावर वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची रेकॉर्डबेक्र सभा झाली होती. या सभेचा रेकॉर्ड मोडण्याच्या दृष्टीनेच कॉंग्रेसने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची समारोपासाठी निवड केली, पण हे धाडस कॉंग्रेसच्या चांगलेच अंगलट आले. 
 

संबंधित लेख