satish chavan and ramdas athavale | Sarkarnama

आठवलेंनी पवार यांच्यासाठी काही मागावे एवढे मोठे ते झालेले नाहीत - सतीश चव्हाण

सरकारनामा ब्युरो
रविवार, 4 नोव्हेंबर 2018

औरंगाबाद : ज्यांना शरद पवारांच्या आर्शिवादानेच खासदारकी मिळाली त्या रामदास आठवलेंनी शरद पवारांसाठी काही मागावे एवढे ते मोठे झालेले नाहीत असा टोला मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आठवले यांना लगावला. शरद पवार एनडीएमध्ये आले तर त्यांना उपपंतप्रधान करू असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच केले होते. 

औरंगाबाद : ज्यांना शरद पवारांच्या आर्शिवादानेच खासदारकी मिळाली त्या रामदास आठवलेंनी शरद पवारांसाठी काही मागावे एवढे ते मोठे झालेले नाहीत असा टोला मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत आठवले यांना लगावला. शरद पवार एनडीएमध्ये आले तर त्यांना उपपंतप्रधान करू असे विधान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच केले होते. 

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले त्यांच्या विविध, मागण्या, राजकीय नेत्यांना देण्यात येणाऱ्या ऑफर आणि आपल्या शीघ्र कवितांमुळे ओळखले जातात. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सध्या केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात समविचारी पक्षांची आघाडी उभारत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कधीकाळी युपीए सोबत तर आता मोदी सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या रामदास आठवलेंनी शरद पवारांनाच एनडीएमध्ये या तुम्हाला उपपंतप्रधान करू अशी ऑफर दिली होती. 

या संदर्भात औरंगाबादेत आमदार सतीश चव्हाण यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी रामदास आठवले यांच्या या विधानाची खिल्ली उडवली. "पवारांच्या आर्शिवादानेच तुम्ही खासदार झालात, तेव्हा त्यांना उपपंतप्रधान करण्या एवढे तुम्ही (आठवले) मोठे झालेला नाहीत' अशा शब्दांत टोला लगावला. औरंगाबाद लोकसभा लढवणार का? या प्रश्‍नावर ही जागा राष्ट्रवादीला सोडा, आमच्याकडे सतीश चव्हाण यांच्या सारखा उमेदवार आहे' असे खुद्द शरद पवार साहेबांनीच औरंगाबाद दौऱ्यात जाहीरपणे सांगितले होते. त्यामुळे या विषयावर एकदा आमच्या नेत्यांनी भूमिका स्पष्ट केल्यावर मी बोलणे योग्य नाही. पक्ष जे ठरवेल त्यादृष्टीने माझी वाटचाल असेल असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. 

जिल्ह्यात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही, जिल्हा परिषद, महापालिकेत बोटावर मोजण्याइतके तुमचे सदस्य आहेत. पक्षाला वर्षभरापासून जिल्हाध्यक्ष नाही याकडे त्यांचे लक्ष वेधले असता ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी कबुल केले. पण आठवडाभरात राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष जाहीर होईल आणि आम्ही जिल्ह्यात ताकद वाढवू असा दावा देखील केला. 

कचरा, पाणी प्रश्‍नाला खैरेच जबाबदार 
शहरातील कचरा आणि प्रश्‍न बिकट होण्यास गेल्या वीस वर्षापासून खासदार असलेले शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हेच जबाबदार असल्याचा हल्ला चव्हाण यांनी चढवला. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून आणि सांगून देखील हे प्रश्‍न सुटत नाही हे अत्यंत गंभीर आहे. शिवसेना-भाजपची सत्ता असलेली महापालिका केवळ केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांसाठी मिळणारा निधी आणि तो बॅंकेत ठेवून जमा होणाऱ्या व्याजावर चालते, समांतरचे पिल्लू खैरेंच्या कमरेवर बसले आहे, त्यामुळेच आता ते याबद्दल गप्प आहेत असा आरोप देखील चव्हाण यांनी यावेळी केला. 

मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळाले पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने तसे आदेश दिल्यानंतर देखील जलसंपदा विभागातील अधिकारी मनमानी पध्दतीने वागत आहेत. जायकवाडीकडे येणारे पाणी कुठलाही जीआर नसतांना त्यांनी रोखले होते. जलसंपदा मंत्र्यांच्या इशाऱ्यावर हे अधिकारी काम करत असल्याचा आरोप करतांनाच त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करा अशी मागणीही सतीश चव्हाण यांनी केली. 

संबंधित लेख