साहेबांबरोबरचा चार तासाचा प्रवास अनमोल ठेवा !

साहेबांबरोबरचा चार तासाचा प्रवास अनमोल ठेवा !

औरंगाबाद : विद्यार्थीदशेतून नेमका बाहेर पडलो आणि खाजगी कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. माझ्या वडिलांचे मित्र बाबुराव खंडेराव पाटील यांच्याकडे मुक्कामाला होतो. विशेष म्हणजे शरद पवार साहेबांचे ते जवळचे मित्र. साहेबांना भेटण्याची तीव्र इच्छा होती, ती बोलून दाखवली. पवार साहेब तेव्हा बी-4 बंगल्यावर राहायचे. बाबुराव पाटलांनी माझ्या हाताला धरले आणि थेट बंगल्यावर नेले. तिथे असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांमधून त्यांनी मला पवार साहेबांकडे नेले "हा भानुदास चव्हाणांचा मुलगा' अशी ओळख करून दिली आणि या पहिल्या भेटीतच माझे साहेबांशी कायमचे नाते जुळले अशी आठवण मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितली. 

सलग दोन टर्म सतीश चव्हाण मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबाशी त्यांचे आपुलकीचे संबंध निर्माण झाले. त्यांच्याबद्दलच्या अनेक आठवणींना चव्हाण यांनी उजाळा दिला. 1983 मध्ये शरद पवारांशी झालेल्या पहिल्या भेटीची प्रसंग सांगताना सतीश चव्हाण म्हणाले, बाबुराव पाटलांनी जेव्हा माझी प्रत्यक्ष भेट करून दिली तेव्हा साहेबांनी माझी आस्थेवाईकपणे विचारपूस केली. विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर मी काम करत असल्याने त्यांनी मराठवाड्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेत प्रदीर्घ चर्चा केली. त्यांच्या चर्चेतून त्यांना विद्यार्थ्यांबद्दल असलेली काळजी स्पष्टपणे दिसत होती. देशाच्या राजकारणात उच्च शिखरावर असणारी व्यक्ती मराठवाड्या सारख्या छोट्या भागातील विद्यार्थ्यांची विचारपूस पोटतिडकीने करतात हे पाहून मी भारावलो. तेव्हापासून त्यांच्या विचारांशी जुळलेली नाळ अजूनही कायम आहे. भविष्यात पवार साहेबां सोबत काम करतांना त्यांचीतील साधेपणा, सहजपणे उपलब्ध होण्याचा गुण याचा मोठा प्रभाव माझ्या आयुष्यावर पडला. 

1993-94 मधील एक प्रसंग या निमित्ताने आवर्जून सांगावासा वाटतो, माझ्या भावाने दोन बससह नव्यानेच ट्रॅव्हल्सचा व्यवसाय सुरू केला होता. डॉ. पद्मसिंह पाटील तेव्हा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या हस्ते बसचे उद्‌घाटन करण्याचे ठरले. योगायोगाने कॉंग्रेसच्या एका कार्यक्रमानिमित्त पवार साहेब देखील त्याच दिवशी शहरात होते. पद्मसिंह पाटलांनी पवार साहेबांना बसचे उद्‌घाटन करायला जायचे असल्याचे सांगितले. तेव्हा "चला मी पण येतो' असे म्हणत पवार साहेब देखील आले. दोन बस शेजारी उभ्या करून ठेवल्या होत्या. पवार साहेब आल्यामुळे पद्मसिंह पाटलांनी फीत कापण्याचा मान त्यांना दिला. तेव्हा हसत पवार साहेब म्हणाले, उद्‌घाटन तर तुमच्या हाताने करायचे होते, पण मीच फीत कापली आता तुम्ही दुसऱ्या बसची फीत कापा. त्यांचा हा सहजपणा मला खूप भावला. आमच्या कुटुंबियासाठी हा क्षण अविस्मरणीय होता. 

त्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रश्‍नावर पवार साहेबांच्या भेटीचा अनेकदा योग आला. जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना घडवून आणलेली बारामती भेट, तिथे साहेबांनी विद्यार्थांशी तासभर केलेली मनमोकळी चर्चा, दिलेले खास भोजन या सगळ्या आठवणी यातून त्यांचा मोठेपणा अधोरेखित होतो. 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी पवार साहेब बीडला आले होते. सभा आटोपून ते मोटारीने बारामतीला निघाले. गाडीत ते एकटेच असल्याची संधी साधत आम्ही तुमच्या सोबत येऊ का असे मी साहेबांना विचारले. तेव्हा मला काही अडचण नाही असे म्हणत त्यांनी माझ्यासह, धनंजय मुंडे, अमरसिंह पंडीत यांना गाडीत बसवून घेतले. चार तासांच्या प्रवासात साहेब जुन्या आठवणीत इतके रमले की त्यांनी आपला सगळा जीवनपटच याप्रवासा दरम्यान आमच्या समोर उलगडला. आमच्यासाठी हा आयुष्यातला अनमोल ठेवा आहे असे मी समजतो. 

(शब्दांकनः जगदीश पानसरे) 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com