satish chaturvedi nagpur news | Sarkarnama

मी 50 वर्षे कॉंग्रेसमध्ये, पक्ष सोडणार नाही : सतीश चतुर्वेदी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

नागपूर ः गेल्या 50 वर्षांपासून मी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. या काळात मी पदाची कधीही अपेक्षा केली नाही. पक्षाने मला खूप काही दिले आहे. कारवाई करून मला कॉंग्रेसमधून काढण्याचे काहींचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. 

नागपूर ः गेल्या 50 वर्षांपासून मी कॉंग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे. या काळात मी पदाची कधीही अपेक्षा केली नाही. पक्षाने मला खूप काही दिले आहे. कारवाई करून मला कॉंग्रेसमधून काढण्याचे काहींचे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाही, अशा शब्दात माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. 

पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप करून महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीने काही दिवसांपूर्वीच चतुर्वेदी यांना पक्षातून निष्कासित केले आहे. या संदर्भात आज त्यांनी पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली. प्रदेश कॉंग्रेस समितीने केलेली कारवाई ही एकतर्फी असून यामागे सूडबुद्धी असल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसच्या काही नेत्यांनी कॉंग्रेस पक्षाची घटना व नियमांच्या विरोधात कारवाई केली आहे. प्रदेश कॉंग्रेसकडून मला अद्यापपर्यंत कोणतेही पत्र मिळालेले नाही. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मला कधीही बोलाविले नाही. या एकतर्फी कारवाईची माहिती वर्तमानपत्रातूनच कळल्याचा दावा त्यांनी केला. 

गेल्या 50 वर्षांपासून मी कॉंग्रेस पक्षाचे काम करीत आहे. कॉंग्रेसचा विचार हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे. कॉंग्रेस पक्षाच्या विचारधारेशी मी आयुष्यभर जुळलो आहे. या विचारधारेपासून मला कुणीही वेगळे करू शकत नाही. आयुष्याच्या अखेरपर्यंत मी कॉंग्रेसचा कार्यकर्ताराहणार आहे. हे पद कुणीही हिरावू शकत नाही, असा युक्तीवाद करून त्यांनी भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले. 

या कारवाईच्या विरोधात आपण अ. भा. कॉंग्रेस समितीकडे दाद मागणार असल्याचे सांगून ते म्हणाले, गुजरातच्या निकालाने पक्षाला नवसंजीवनी मिळाली आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षापासून दूर गेलेल्यांना जवळ आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. हे चित्र असताना पक्षातून निष्ठावंतांना पक्षातून काढून नागपुरात कोण, कोणत्या पक्षाला फायदा पोहोचवित आहे, याचे स्पष्टीकरण आपण पक्षश्रेष्ठीकडे देऊ, असेही चतुर्वेदी यांनी सांगितले. 

संबंधित लेख