Satej Patil says its start for 2019 victory | Sarkarnama

सतेज पाटील म्हणतात ही तर २०१९ च्या विजयाची नांदी!

निवास चौगले
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

कोल्हापूरमधील राजकारणात महाडिक विरुद्ध बंटी पाटील हा सामना रंगतदार असतो. ग्रामपंचायत निवडणुकीत महाडिकांच्या गावातच काॅंग्रेसच्या बंटी पाटील यांनी बाजी मारली. त्यामुळे पाटील यांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे या निकालावर त्यांनी २०१९ चे भाकितही करून टाकले.

कोल्हापूर : कोल्हापूरमधील ग्रामपंचायत निकालाने सर्वाधिक हर्ष माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांना झाला आहे. भाजपच्या कारभाराला चोख उत्तर मतदारांनी दिले आहे. त्यामुळे दक्षिण कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातील २०१९ च्या विजयाची नांदी या निकालाने झाल्याचा दावा त्यांनी केला. 

याबाबत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेत सतेज पाटील म्हणतात की दक्षिण कोल्हापूर मतदारसंघामध्ये १९ पैकी १३ ग्रामपंचायती मध्ये सरपंच निवडून देऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपला धोबिपछाड दिले आहे. या निकालाने २०१४ची निवडणूक ही लाट होती, हे लक्षात आले आहे. गेल्या तीन वर्षामध्ये भाजपचा जो काही कारभार आह, त्याला चोख उत्तर ग्रामपंचायतच्या माध्यमातून दक्षिण कोल्हापूर मतदारसंघातील जनतेने दिले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील प्रत्येक तालुक्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत एक चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. या परिवर्तनाची नांदेड महापालिकेपासून सुरवात झाली, आणि आता कोल्हापूरमध्ये देखील निश्चितपणे ते झाल्याचे या निकालाने सिद्ध झाले आहे. २०१९ ची विधान सभा निवडणुकीची नांदी आज ग्रामपंचायत पासून सुरु झाल्याचे सतेज पाटील यांनी नमूद केले आहे.
निमित्ताने सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून आभार मानायचे आहेत .मतदारांनी विश्वासानं अनेक गावांमध्ये ग्रामपंचायत चालवण्याची जी जबाबदारी दिली आहे, ती आमचे कार्यकर्ते सक्षमपणे पार पाडतील, हा विश्वास मी आपणास देतो आणि पुन्हा एकदा आपले आभार मानतो. निवडून आलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचे मनापासून अभिनंदन करत त्यांनी २०१९ च्या तयारीचा श्रीगणेशा केल्याचे मानण्यात येत आहे.

दक्षिण कोल्हापूर मतदारसंघात अमल महाडिक यांनी भाजपकडून निवडणूक लढवून बंटी पाटील यांना पराभूत केले आहे. या पराभवाची परतफेड करण्यासाठी पाटील यांनी आतापासूनच कंबर कसल्याचे या निकालावरून दिसत आहे. आगामी काळात महाडिकही या तयारीत मागे राहणार नसल्याने येथील निवडणूक आतापासूनच उत्कंठावर्धक ठरण्याची चिन्हे आहेत.
 

संबंधित लेख