satej paatil-dhanjay mahadik politics | Sarkarnama

रहस्यभेद :  सतेज पाटील यांनी उंबरठा ओलांडला असता तर... 

निवास चौगुले 
मंगळवार, 30 मे 2017

राजकारण स्वाभिमानानेच करावे लागते. मात्र, वेळप्रसंग पाहून लवचिक धोरणही स्वीकारावे लागते. तडजोडीने मार्ग काढावा लागतो. महत्त्वाच्या प्रसंगाला तोंड देताना झटपट निर्णय घ्यावे लागतात. वेळ साधावी लागते. एकदा वेळ हुकली, एखादा निर्णय चुकला तर त्याची मोठी किंमत मोजावी लागते. धनंजय महाडीक आणि सतेज पाटील या दोघांत घडलेल्या प्रसंगावरून हीच गोष्ट अधोरेखित होते. 

कोल्हापूर जिल्ह्यात "महाडीक विरुद्ध सतेज पाटील' हा संघर्ष सर्वांनाच माहिती आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार महादेवराव महाडीक यांचे पुतणे धनंजय महाडीक हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार आहेत. महादेवरावांचे पुत्र अमल महाडीक हे भाजपचे आमदार आहेत. कॉंग्रेसचे माजी राज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करून ते निवडून आले आहेत. परिणामी, कॉंग्रेसने महादेवराव महाडिकांना पक्षातून निलंबित केलेले आहे. यासंदर्भाने खासदार धनंजयराव महाडीक यांनी "सरकारनामा'शी बोलताना मोठा गौप्यस्फोट केला. 

धनंजय महाडीक म्हणाले, की 2014 ची लोकसभा निवडणूक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आघाडी करून एकत्रित लढविली होती. त्या वेळी महाडीक व सतेज पाटलांचे तीव्र मतभेद होतेच. राजकारणात विरोध असावा; पण शत्रुत्व असू नये या भावनेने मी सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला. त्यांचा पाठिंबा माझ्यादृष्टीने महत्त्वाचा होता. त्यांनी पाठिंबा हवा असेल तर घरी येऊन विनंती करण्याचा आग्रह धरला. राजकीय परिस्थिती व आव्हाने पाहून मी कोणतेही आढेवेढे घेतले नाही. कमीपणा मानला नाही. राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना सोबत घेऊन मी सतेज पाटील यांच्या भेटीसाठी गेलो. तेथे सतेज पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावाच ठेवलेला होता. सर्वांसमक्ष सतेज पाटील यांनी आणि इतर वक्‍त्यांनी माझ्यावर तोंडसुख घेतले. महाडीक कुटुंबीयांचा शेलक्‍या विशेषणांसह उद्धार झाला. शेवटी सतेज पाटील यांनी कार्यकर्त्यांना शपथ घालून माझे काम करण्याचे आदेश दिले. दोन्ही पक्षांची आघाडीही होतीच. त्यांनी मदत केली व मी निवडून आलो. 

सहा महिन्यांनी निवडणूक लागली, तेव्हा मात्र कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील आघाडी तुटली होती. सतेज पाटील यांच्या विरोधात कोण? अशी चर्चाही सुरू झाली होती. त्यावेळी सतेज पाटील यांनी मदतीसाठी माझ्याकडे संपर्क साधला. माझ्यादृष्टीने माझे काका महादेवराव महाडीक हे महत्त्वाचे आहेत. लोकसभेला त्यांनीच माझ्यामागे मोठी ताकद लावली होती. त्यामुळे मी त्यांना न विचारता परस्पर निर्णय घेणे योग्य नव्हते. यातून मार्ग निघावा यासाठी मी सतेज पाटील यांना असा निरोप धाडला की, त्यांनी शिरोली येथील महादेवराव महाडीक यांच्या निवासस्थानी येऊन पाठिंबा मिळवावा. सतेज पाटील यांनी वेळेचे व प्रसंगाचे महत्त्व ओळखून आमच्या घराचा उंबरठा ओलांडला असता, तर आज कदाचित चित्र वेगळे झाले असते. त्यामुळे चित्र पालटले आणि अमल महाडीक (माझे चुलत बंधू व महादेवरावांचे चिरंजीव) काही दिवसांत भाजपचे आमदार म्हणून निवडून आले. सतेज पाटील यांच्याबाबत मला दुसरा पर्याय नव्हता. जर ते तेव्हा आले असते तर...! 

संबंधित लेख