satara zp politics | Sarkarnama

शेखर गोरेंनी कापला पोळांचा पत्ता!

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो
शनिवार, 1 एप्रिल 2017

उपाध्यक्षपदासाठी आग्रही मानसिंगराव जगदाळेंच्या पदरी आजही निराशाच पडली. नाराज झालेले मानसिंगराव अध्यक्षांच्या निवासस्थानातून थेट बाहेर पडण्याच्या तयारीत होते. त्यांचे डोळे भरून आले. पण संजीवराजेंनी त्यांना धीर दिला. "मी आता जातोच,' असे मानसिंगराव म्हणत असतानाच त्यांना आवरत संजीवराजेंनी त्यांना बैठकीत ओढत नेले. पण चेहऱ्यावरील नाराजी मानसिंगराव लपवू शकले नाहीत.

सातारा : अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीत खासदारकीची गणिते जुळविणाऱ्या राष्ट्रवादीने आज सभापती निवडीत आमदारकीची गणिते जुळविली आहेत. पाटण, माण मतदारसंघात राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने तेथे संधी दिली. या निवडीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचीच छाप राहिली आहे. तसेच आमदार शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील हेच किंगमेकर ठरले. पण गॉडफादर नसल्याने पोळ कुटुंबीयांना निवडीत डावलेल्याचे चित्र आहे.

अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी डावल्याने सभापतिपदाची तरी संधी मिळावी, अशी इच्छुकांना होती. पाटणचे राजेश पवार, खंडाळ्याचे मनोज पवार, औंधचे शिवाजी सर्वगोड यांची निवड अपेक्षित होती. माजी आमदार (कै.) सदाशिव पोळ यांच्या स्नुषा डॉ. भारती पोळ यांचा पत्ता ऐनवेळी कट झाला. पाटण व माण मध्ये राष्ट्रवादीचा आमदार नसल्याने तेथे बळ देण्यासाठी म्हावशी गट (ता. पाटण) व औंध (ता. खटाव) गटाला अनुक्रमे शिक्षण, समाजकल्याण सभापतिपदाची संधी देत पुढील विधानसभा निवडणुकीची गणिते जुळविण्यात आली. या निवडींनी राष्ट्रवादीत विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याबरोबरीने शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांचे वर्चस्व सिद्ध केले.

उपाध्यक्षपदासाठी डावल्याने माजी आमदार विक्रमसिंह पाटणकरांनी लावलेला जोर सर्वाधिक प्रभावी ठरला. सकाळी दहा वाजण्यापूर्वीच त्यांनी अध्यक्ष निवासस्थानी तळ ठोकला होता. त्यापाठोपाठ आमदार बाळासाहेब पाटील, माजी आमदार प्रभाकर घार्गे, शेखर गोरे यांनी हजेरी लावली. अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी इच्छुक असूनही डावलल्यानंतरही कऱ्हाडचे मानसिंगराव जगदाळे यांना किमान सभापतिपदासाठी पहिली संधी मिळेल, अशी आशा होती. पण त्यांना कोणाचेच पाठबळ न मिळाल्याने शेवटी शनिवार हा त्यांच्यासाठी उपवास वारच ठरला. तर दुसऱ्या डॉ. भारती पोळ यांना महिला व बालकल्याण सभापती पदासाठी सर्वाधिक संधी दिली जाणार, अशी शक्‍यता होती. मात्र, शेखर गोरे यांनी आंधळी (ता. माण) गटातील बाबासाहेब पवार यांनाच पद देण्याचा आग्रह धरला. याचा दुसरा अर्थ पोळ कुटुंबाला नको, असे मतप्रवाह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मानला. थेट शरद पवार यांच्याशी भेटीगाठी घेऊन शब्द मिळविलेल्या पोळ कुटुंबीयांचा मात्र पुरता भ्रमनिरास झाला.

पद मिळविण्यासाठी कोणत्यातरी नेत्याचा हात डोक्‍यावर असावा लागतो. हे आजच्या निवडीने स्पष्ट झाले. राजेश पवार हे श्री. पाटणकरांचे अत्यंत निकटवर्तीय असल्याने त्यांना संधी मिळाली. मात्र, डॉ. पोळ यांचे नावच कोणी पुढे न केल्याने सर्वाधिक चर्चेत असलेले नाव रिंगणातून बाहेर पडले. याचा फायदा थेट कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील पाटखळ गटाच्या सदस्या वनिता गोरे यांना झाला. या निवडीतून विधानसभा निवडणुकीची गणिते जुळविली असली तरी त्याचा नेमका कोणाला फायदा होईल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे.

 

संबंधित लेख