satara zp | Sarkarnama

झेडपी अध्यक्षपदी निंबाळकर की आणखी कुणी? 

सरकारनामा ब्युरो 
शनिवार, 18 मार्च 2017

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी ताकद लावल्याने कोणाचे नाव निश्‍चित करायचे यावरून नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. पद
मागणाऱ्यांनी आपण या पदासाठी कसे पात्र आहोत, हे सांगण्यास सुरवात केली आहे.

सातारा : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांनी ताकद लावल्याने कोणाचे नाव निश्‍चित करायचे यावरून नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे. पद
मागणाऱ्यांनी आपण या पदासाठी कसे पात्र आहोत, हे सांगण्यास सुरवात केली आहे. प्रथमच इच्छुकांपैकी काहीजणांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि
माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांपर्यंत जाऊन बाजू मांडली आहे. सद्यःस्थितीत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव पुढे असलेतरी प्रत्यक्ष अध्यक्ष कोण होणार, हे
निवडणुकीदिवशीच स्पष्ट होणार आहे. 

संजीवराजे यांच्यासह मानसिंगराव जगदाळे, वसंतराव मानकुमरे, सुरेंद्र गुदगे, जयवंत भोसले, राजेश पवार, मनोज पवार हेही अध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. 

संजीवराजे नाईक-निंबाळकर (फलटण) : निंबाळकर घराण्यातील असून 1992 पासून ते जिल्हा परिषदेवर निवडून येत आहेत. यावेळेस त्यांची सहावी टर्म आहे. यापूर्वी
ते फलटण पंचायत समितीचे सभापती होते. तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही होते. यावेळेस अध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार आहेत. विधान परिषदेचे सभापती
रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू असून त्यांचे पाठबळ अध्यक्षपदापर्यंत जाण्यास संजीवराजेंना सोपे होणार आहे. जिल्हा परिषदेतील कामकाजाचा व सभागृह
अगदी कुशलतेने चालविण्याचा त्यांचा हातखंडा आहे. 

मानसिंगराव जगदाळे (कऱ्हाड) : राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून पक्षासोबत असून कऱ्हाडचे तालुकाध्यक्ष आहेत. यापूर्वी दोन पंचवार्षिक जिल्हा परिषद सदस्य होते. ही
त्यांची तिसरी टर्म आहे. आमदार बाळासाहेब पाटील यांच्याशी त्यांचे फारसे जुळत नाही. अध्यक्षपदाचे ते प्रबळ दावेदार असून त्यांनी थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी
केंद्रीय मंत्री शरद पवारांची भेट घेऊन आपण अध्यक्षपदाचा दावेदार असल्याचा मुद्दा मांडला आहे. पक्षाशी एकनिष्ठता व जिल्हा परिषदेतील कामांचा अनुभव हे दोन
मुद्दे त्यांचा बाजूने आहेत. 

वसंतराव मानकुमारे (जावली) : दुसऱ्यांदा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले आहेत. यापूर्वी शिक्षण सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले असून त्यांची
कारकीर्द त्यावेळी गाजली होती. ते शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये आले आहेत. शिवसेनेत असताना ते जावली पंचायत समितीचे सभापती होते. सध्या ते जिल्हा
मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे तज्ञ संचालक आहेत. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे त्यांना पाठबळ आहे. अध्यक्ष किंवा उपाध्यक्षपदासाठी दुसरे प्रबळ दावेदार म्हणून
मानकुमरेंचे नाव आहे. त्यांना अध्यक्षपद मिळावे यासाठी खुद्द आमदार शिवेंद्रसिंहराजे आग्रही आहेत. 

सुरेंद्र गुदगे (खटाव) : माण-खटाव तालुक्‍यातील राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत. या दोन तालुक्‍यात पक्षाचा आमदार नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
किंवा उपाध्यक्ष पद या मतदारसंघात दिले जाण्याची शक्‍यता आहे. श्री. गुदगे हे एकटेच पक्षाचा झेंडा घेऊन वाटचाल करत असून त्यांनी भाजपचे माजी आमदार डॉ.
दिलीप येळगांवकरांची रणनीती अपयशी ठरवत यश संपादन केले आहे. श्री. गुदगे यांना पद मिळावे म्हणून पक्षातील कोणीही त्यांच्या पाठीशी नाही. 

जयवंत भोसले (कोरेगाव) : ल्हासुर्णे गटातून निवडून आले असून आमदार शशिकांत शिंदेंचे ते कट्टर समर्थक मानले जातात. जिल्हा परिषद अध्यक्षपद खुले
असल्याने आमदार शिंदेंनी श्री. भोसलेंना एकदातरी संधी मिळावी, या दृष्टीने आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत. खुद्द जयवंत भोसलेही अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष
पदाच्या शर्यतीत असल्याचे सांगत आहेत. त्यांना केवळ आमदार शशिकांत शिंदेंचेच पाठबळ आहे. ते प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांचा
नावाचा विचार होण्याची शक्‍यता फारशी नाही. त्यांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत दाखवून इतर कोणतेतरी सभापती पद तालुक्‍यात आणण्यासाठी आमदार शशिकांत
शिंदेंचा प्रयत्न आहे. 

राजेश पवार (पाटण) : प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत. पाटण तालुक्‍याला
अध्यक्षपदाचा मान भागवतराव देसाई यांच्यानंतर मिळालेला नाही. त्यामुळे राजेश पवार यांच्या नावाचा आग्रह पाटणकरांच्या वतीने धरला गेला आहे. 

मनोज पवार (खंडाळा) : राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष असून बाजार समितीचे संचालक आहेत. यावेळेस प्रथमच जिल्हा परिषदेवर निवडून आले आहेत. आमदार
मकरंद पाटील यांचे पाठबळ असून त्यांच्या अध्यक्षपदासाठी आमदारही आग्रही आहेत. खंडाळा तालुक्‍याला यापूर्वी अध्यक्षपद मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना नवखा
चेहरा म्हणून संधी मिळावी, अशी मागणी आहे. 

संबंधित लेख