satara udyanraje power equation | Sarkarnama

ज्या 4 आमदारांनी उदयनराजेंना खिंडीत गाठले, त्यांची आमदारकी संकटात येणार? 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी बहिष्कार घातला. त्यामुळे उदयनराजेंना आगामी लोकसभा निवडणूक जड जाणार, हे स्पष्टच आहे. मात्र या आमदारांविरोधातही उदयनराजेंकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. त्याचा परिणाम म्हणून उदयनराजेंच्या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे चारही आमदार अडचणीत येवू शकतात.

सातारा: राजकारणात क्रिया झाली की प्रतिक्रया घडत असते. स्थानिक संघर्षातून राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवस कार्यक्रमावर राष्ट्रवादीच्या आमदारांनी बहिष्कार घातला. त्यामुळे उदयनराजेंना आगामी लोकसभा निवडणूक जड जाणार, हे स्पष्टच आहे. मात्र या आमदारांविरोधातही उदयनराजेंकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. त्याचा परिणाम म्हणून उदयनराजेंच्या लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे चारही आमदार अडचणीत येवू शकतात. 

सातारा लोकसभा मतदारसंघात सातारा, वाई, कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. कऱ्हाड दक्षिण कॉंग्रेसकडे तर पाटण शिवसेनेकडे आहे. नुकत्याच झालेल्या उदयनराजेंच्या वाढदिवसाला कऱ्हाड दक्षिणचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आवर्जून उपस्थित होते. पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी तर प्रास्ताविक केले, मात्र पक्षाचे असूनही शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), मकरंद पाटील (वाई), शशिकांत शिंदे (कोरेगाव), बाळासाहेब पाटील (कऱ्हाड उत्तर) अनुपस्थित राहिले. ते साताऱ्यात होते, मात्र उदयनराजेंचा निषेध म्हणून कार्यक्रमाला आले नाहीत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली त्यांना ताकद दाखवायची होती, ती त्यांनी दाखवली. वाढदिवस हा खुलेपणाने शुभेच्छा देण्याचा दिवस असतो, मात्र त्याच दिवशी उदयनराजेंना ताकदीने खिंडीत पकडण्याचा प्रयत्न झाला. उदयनराजेंच्या सोयीप्रमाणे वागणार नाही, तर त्यांना पक्षाच्या सोयीप्रमाणे वागावे लागेल, असा संदेश देण्यात आला. त्याचा परिणाम लोकसभेला दिसणारच आहे. तिकीट मिळवण्यापासून विजयी होण्यापर्यंत उदयनराजेंना दक्ष राहावे लागणार आहे. 

या डावपेचांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांना उत्तर देण्यासाठी उदयनराजेंना रणनिती आखावी लागणार आहे. उदयनराजेंचा प्रत्येक तालुक्‍यात गट असून कार्यकर्त्यांचे जाळे आहे. सातारा तालुक्‍यात यापुढे सर्वसामान्य आमदार होईल, असे उदयनराजेंनी जाहीर केले आहे. याचा अर्थ त्यांना शिवेंद्रसिंहराजे आमदार म्हणून नको आहेत. उदयनराजे कोणत्याही पक्षात असलेतरी ते त्यादृष्टीने प्रयत्न करतील. वाई मतदारसंघात उदयनराजेंना मानणाऱ्यांची संख्या मोठी आहे. कोरेगाव आणि कऱ्हाड उत्तर तर त्यांच्या प्रभावक्षेत्राचा भाग आहे. त्यामुळे या चारही विधानसभा मतदारसंघात उदयनराजेंची निर्णायक ताकद आहे. उदयनराजे राष्ट्रवादीत राहिलेतरी या मतदारसंघात ते आपली ताकद दाखविण्याचा आवर्जुन प्रयत्न करतील. ते राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपकडे गेले तर या चारही मतदारसंघात धक्‍कादायक निकाल लावण्याची क्षमता उदयनराजेंकडे आहे. राष्ट्रवादीच्या आमदारांकडून उदयनराजेंना होत असलेला विरोध लोकसभेपुर्वी मावळला नाहीतर उदयनराजे चार मतदारसंघात खात्रीशीर उलाढाल करतील आणि त्यांची आमदारकी संकटात आणतील, अशी शक्‍यता आहे. 

संबंधित लेख