सातारा शिक्षक बॅंकेची सभा ४० मिनिटांत गुंडाळली..सांगलीची पुनरावृत्ती टळली

सातारा शिक्षक बॅंकेची सभा ४० मिनिटांत गुंडाळली..सांगलीची पुनरावृत्ती टळली

सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅंकेच्या सभेत व्याज दर कमी करा, ही मागणी लावून धरत विरोधकांनी शिट्ट्या आणि घोषणाबाजी केल्याने सत्ताधारी शिक्षक संघाच्या संचालकांनी सर्व विषय मंजूर म्हणत 40 मिनिटात सभा गुंडाळली.

सभा संपली तरी शिक्षक समिती व संघाचे सभासद एकमेकांच्या विरोधात घोषणा देत होते. अखेर पोलिसांनी सर्वांना हॉलच्या बाहेर काढून दार बंद केले. त्यानंतर समितीच्या नेत्यांनी हॉल शेजारील एका झाडाखाली प्रतिसभा घेऊन शिक्षक बॅंकेवर सत्ता स्थापन करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहन शंकर देवरे यांनी केले. 

सांगलीत शिक्षक बॅंकेच्या सभेत झालेल्या हाणामारीच्या पार्श्‍वभूमीवर साताऱ्यातील शिक्षक बॅंकेच्या सभेत काय होणार अशी सर्वांना उत्सुकता होती. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. पण येथे हाणामारी झाली नाही. सभा 40 मिनिटात संपली.

शिक्षक बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली येथील पुष्कर मंगल कार्यालयात सभेस सुरवात झाली. सुरवातीला अध्यक्षांनी प्रास्ताविक केले आणि बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विषय वाचनास सुरवात केली. यावेळी शिक्षक समितीच्या सभासदांनी गोंधळ घालण्यास सुरवात केली. व्याज दर कमी करा, आमच्या मागण्या मान्य करा, अशी मागणी शंकर देवरे यांनी केली.

त्यावर सर्वांच्या प्रश्‍नांना आम्ही उत्तरे देऊन सर्वांनी शांत राहावे, असे आवाहन उपाध्यक्ष महेंद्र अवघडे यांनी केले. पण समितीचे सदस्य ऐकण्यास तयार नव्हते. पोलिस निरिक्षक नारायण सारंगकर यांनी मध्यस्थी करून सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण समितीचे सदस्य माईकची मागणी करत होते. तर सत्ताधारी संचालक मात्र, माईक देण्यास तयार नव्हते. यातूनच पुन्हा घोषणाबाजीला सुरवात झाली. सुरवातीची दहा मिनिटे सभा चालली नंतरची 30 मिनिटे सभेत केवळ गोंधळ, घोषणा आणि शिट्ट्याच ऐकू येत होत्या.

 
शिक्षक समिती झिंदाबाद, व्याजदर कमी करा, कर्मचाऱ्यांचे पैसे कोणाच्या घशात असे फलकही समितीच्या सदस्यांनी सभागृहात दाखविले. सुरवातीपासून शांत बसलेल्या संघाच्या सदस्यांनी समितीच्या सदस्यांचा गोंधळ पाहून त्यांनीही घोषणाबाजी सुरू केली. शेवटी समिती व शिक्षक संघाच्या सदस्यांचे घोषणायुद्ध थांबत नसल्याने अध्यक्ष व उपाध्यक्षांनी सर्व विषय मंजूर म्हणत सभा संपल्याचे जाहीर करत वंदेमातरम्‌ सुरू केले. यानंतरही शिक्षक समिती व संघाचे सदस्य घोषणाबाजी करत होते. पोलिसांनी सर्वांना बाहेर काढले, त्यावेळी मंगल कार्यालयाच्या बाहेर दोन्ही बाजूच्या सदस्यांची घोषणाबाजी सुरू होती.

यानंतर शिक्षक समितीच्या संचालक, सभासद व नेत्यांनी मंगल कार्यालयाच्या जवळच प्रतिसभा घेऊन शिक्षक बॅंकेची सत्ता पुन्हा समितीच्या ताब्यात आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागा, असे आवाहन समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर देवरे यांनी केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com