satara sp action on phaltan policemen | Sarkarnama

फलटण API सह चार पोलिस निलंबित, SP पंकज देशमुखांची कारवाई 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 25 नोव्हेंबर 2018

आगवणे यांची प्रकृती चिंताजनकच असल्याचे सांगण्यात येत आहे.  

फलटण : स्वराज संघटनेचे अध्यक्ष दिगंबर आगवणे यांच्या प्रकरणात पोलिस कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक कागदपत्रात फेरबदल केल्याच्या कारणावरून फलटण ग्रामीण पोलिस ठाण्याचा एक अधिकारी व चार कर्मचारी अशा पाचजणांना पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निलंबित केले आहे.

22 नोव्हेंबरच्या मध्यरात्री विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आगवणे यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. 

दिगंबर आगवणे हे विविध मागण्यांसाठी फलटणच्या प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले होते. त्यानंतर बनावट तक्रारीबाबत सहायक पोलिस निरीक्षक समीर शेख यांच्याकडे चौकशी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. याबाबत तपासी अधिकाऱ्यांनी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात प्रत्यक्ष अभिलेखाची तपासणी केली. त्यानंतर दिगंबर आगवणे व जबाबदार पोलिस कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवण्यात आला होता. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक बी. एस. शिंदे, पोलिस हवालदार एन. एस. मते, आर. बी. लिमण, पोलिस नाईक आर. डी. देवकर, पोलिस नाईक एस. पी. भोसले यांचे निलंबन केल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक डॉ. अभिजित पाटील यांनी दिली.

दरम्यान, पोलिस प्रशासन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून आगवणे यांनी (ता. 22) रोजी मध्यरात्री विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती चिंताजनकच असल्याचे सांगण्यात येत आहे.  

संबंधित लेख