satara shrinivas patil may be loksabha candiadate | Sarkarnama

वारंवार दणके देणाऱ्या उदयनराजेंना आता राष्ट्रवादी झटका देणार? 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

लोकसभा आली की उदयनराजे पक्षाचे असतात! 
उदयनराजे आणि राष्ट्रवादीचे कधी फारसे पटलेले नाही. त्यांचा सातत्यपुर्ण संघर्ष राष्ट्रवादीशी राहिलेला आहे. 2009 च्या लोकसभेला दोन्ही बाजूंनी समन्वय साधत तडतोड झाली. उदयनराजे राष्ट्रवादीचे उमेदवार बनून आरामात खासदार झाले. मात्र निवडणुकीनंतर ते पक्षापासून दूर राहिले. पुण्यात येवून ते पवार कुटुंबियांवर हल्लाबोल करत. 2014 ची लोकसभा आली की त्यांनी पक्षाशी जुळवून घेतले. पुन्हा खासदार झाले. मुळात उदयनराजे हे पक्ष मानत नाहीत. मानलाच तर सोयीनुसार, ही त्यांची खासियत आहे. नगरपालिकेच्यावेळी त्यांनी अजित पवारांचे नाव घेवून भ्रष्टाचाराचे आरोप केले. विधान परिषदेचे सभापती रामराजे यांच्याशी वाद तर सर्वश्रुत आहे. राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांशी त्यांचे जमत नाही. उदयनराजे कधी स्वत:ची आघाडी करतात तर कधी भाजपशी युती. त्यांना भाजपचीही ऑफर आहे. त्यामुळे वेळ पडलीच तर राष्ट्रवादीला उदयनराजेंशी टक्‍कर घेणार उमेदवार तयार हवा आहे. 

 

सातारा : सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या वाढदिवसानिमित्ताने राजकिय वातावरण हलवून सोडले आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुर्वीच्या कऱ्हाड मतदारसंघाचे खासदार आणि सद्या सिक्‍किमचे राज्यपालपद भूषवित असलेल्या श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन कमराबंद चर्चा केली. या घडामोडीतून राष्ट्रवादी ऐनवेळी भोसलेंच्या विरोधात पाटलांचे कार्ड वापरण्याची शक्‍यता वर्तविली जाऊ लागली आहे. 

लोकसभा निवडणुकीला दीड वर्षे राहिले आहे. त्यामुळे इच्छुकांनी संपर्क वाढविण्यास सुरवात केली आहे. उदयनराजे भोसले यांनी चांगलेच रान पेटविले आहे. येत्या 24 तारखेला त्यांचा वाढदिवस आहे. या दिवसाचे औचित्य साधून त्यांनी सर्व पक्षिय दिग्गज नेते एका व्यासपीठावर आणून राजधानी महोत्सव घेण्याचे नियोजन केले आहे. नेतेमंडळींना निमंत्रणे पाठवून त्यांच्याकडून होकारही घेतला आहे. यामुळे जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघालेले असतानाच कऱ्हाड मध्ये सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी खुद्द शरद पवार आले. त्या दोघांनी साधारण तासभर कमराबंद चर्चाही केली. या चर्चेमुळे श्री. पवारांची भेट सर्वांना अधिक महत्वपूर्ण वाटू लागली आहे. 

राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून 2009 पर्यंत श्रीनिवास पाटील हे कऱ्हाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. 2009 मध्ये मतदारसंघांची पूनर्रचना झाल्यानंतर श्रीनिवास पाटील यांना सातारा लोकसभेची उमेदवारी मिळाली नव्हती. केंद्रातील आघाडी सरकारचा कार्यकाल संपत असताना घटक पक्षांना राज्यपाल नियुक्तीत संधी देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी शरद पवार यांच्या शिफारशीनुसार श्रीनिवास पाटील यांना सिक्किमचे राज्यपालपदी नियुक्ती दिली होती. या नियुक्तीपूर्वी काही महिने आधी श्री. पवार श्रीनिवास पाटील यांच्या बंगल्यावर येऊन भोजन करून त्यांच्याशी चर्चा करून गेले होते. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी श्री. पवार पुन्हा आपल्या जिवलग मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी कोल्हापूर दौरा अटोपून कऱ्हाडात आले. भोजन करून दोन मित्रांनी साधारण तासभर कमराबंद चर्चा ही केली. श्रीनिवास पाटील यांची राज्यपाल पदाची मुदत काही महिन्यात संपणार आहे. या पार्श्‍वभूमीवर श्री. पवार आणि श्रीनिवास पाटील यांच्यातील ही कमराबंद चर्चा अनेक प्रश्‍न उपस्थित करणारी आहे. कदाचित उदयनराजेंनी ऐनवेळी वेगळी भुमिका घेतल्यास त्यांच्याविरोधात श्री. पाटलांचे कार्ड वापरण्याची तयारी असावी, यादृष्टीकोनातून पवारांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे. 

संबंधित लेख