satara shivsena | Sarkarnama

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वाढले; पक्ष कधी वाढणार ? 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 9 जुलै 2017

नव्या जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र करण्याची मोहिम चंद्रकांत जाधव यांनी हाती घेतली असून ते लवकरच जिल्हा दौरा करणार आहेत. पण आजपर्यंत पालकमंत्री विजय शिवतारेंनी जिल्ह्यातील पक्ष संघटनेकडे दूर्लक्ष केले होते. आता तरी ते पक्ष संघटना बांधणीकडे लक्ष देणार का, हा प्रश्‍न महत्वाचा आहे. 
 

सातारा : जिल्ह्याच्या शिवसेना कार्यकारिणीत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशानुसार बदल करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यासाठी तब्बल तीन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती केली आहे. यामध्ये माण-खटाव व फलटणसाठी चंद्रकांत जाधव, वाई व कोरेगाव मतदार संघसाठी राजेश कुंभारदरे, तर पूर्वीचे हर्षल कदम यांच्याकडे कऱ्हाड दक्षिण, उत्तर, सातारा आणि पाटण मतदारसंघाची जबाबदारी कायम ठेवली आहे. 

सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांवर याच पक्षाचे वर्चस्व आहे. शिवसेनेचीही प्रत्येक तालुक्‍यात ताकद आहे. पण ही ताकद विखुरलेली आहे. भाजप, शिवसेना युती व मित्रपक्षांचे सरकार राज्यात आल्यानंतर सातारा जिल्ह्याला शिवसेनेच मंत्री विजय शिवतारे यांच्याकडे पालकमंत्री पद देण्यात आले. पण, शिवतारेंचे संघटना बांधणीकडे दूर्लक्ष झाल्याने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांत नाराजीचा सूर होता. याच दरम्यान, शिवसेने दोन जिल्हा प्रमुख नेमले. यामध्ये हर्षल कदम व दुसरे नंदकुमार घाडगे होय. यांच्याकडे चार, चार मतदारसंघांचा कार्यभार वाटून देण्यात आला होता. पण, या दोघांच्या निवडीला काही शिवसैनिकांचा विरोध होता. त्यामुळे ताकद असूनही शिवसेनेची फळी विस्कळीत होती. पण आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेचे पक्षाध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत बैठक घेऊन पक्षातील काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सातारा जिल्ह्यात दोन ऐवजी तीन जिल्हा प्रमुखांची निवड करण्यात आली. तर नंदकुमार घाडगे यांना डच्चू देऊन त्यांच्या जागी राजेश कुंभारदरे यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. यावेळेस चंद्रकांत जाधव यांच्यावर माण, खटाव व फलटण मतदारसंघांची जबाबदारी दिली आहे. तर हर्षल कदम यांचे जिल्ह प्रमुख पद कायम ठेवले आहे. आता हे तीन जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून शिवसेनेची पुन्हा नव्याने बांधणी होणार आहे. 

 

संबंधित लेख