पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला जाणार; 'टीम राहूल'मध्ये स्थान अन राज्यसभेचे सदस्यत्व मिळणार? 

आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसकडून दिल्लीत अभ्यासू नेत्यांची टीम जमविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे.
पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला जाणार; 'टीम राहूल'मध्ये स्थान अन राज्यसभेचे सदस्यत्व मिळणार? 

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीत मोदींना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसकडून दिल्लीत अभ्यासू नेत्यांची टीम जमविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. आजपर्यंत कॉंग्रेसमध्ये विविध पदांवर यशस्वीपणे काम केलेल्या श्री. चव्हाणांवर पक्षश्रेष्टींकडून विश्वास टाकला जाण्याचे संकेत आहेत. सध्या याबाबतची पोस्ट सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. सातारा जिल्ह्यातील चव्हाण समर्थकांकडूनही याला दुजोरा मिळू लागला आहे. 

महाराष्ट्रातील आदर्श सोसायटी प्रकरणावरून कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले. त्यावेळी पक्षश्रेष्ठींनी राज्यातील राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन केंद्रात संसदीय कामकाज सांभाळणाऱ्या पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात पाठविले होते. 014 च्या निवडणुकीत मोदी लाटेत राज्यात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. गेल्या तीन वर्षांत केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात आंदोलने उभे केल्यानंतर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभर दौरे करून भाजप सरकारविरोधात अभ्यासपूर्ण भूमिका मांडली. शेतकरी कर्जमाफी, अर्थसंकल्पातील घोषणा, बेरोजगारी या मुद्यांवर चव्हाणांनी सरकारची कोंडी केली. गुजरात निवडणुकीत कॉंग्रेसने चांगली कामगिरी केली. गुजरात विधानसभा व राजस्थानातील पोटनिवडणुकीनंतर आता 2019 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. 

यानिमित्ताने मोदींना टक्कर देण्यासाठी कॉंग्रेसच्यावतीने देशभरातील अभ्यासू नेत्यांची टीम तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. या टीममध्ये दिग्गज व अभ्यासू नेत्यांचा समावेश होणार आहे. यात केंद्रासह विविध राज्यांचा अभ्यास असणारे पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आघाडीवर आहे. 
राहूल गांधी एकटे संपूर्ण देशभर हिंडून लोकसभेचा प्रचार करू शकणार नाहीत. त्यांच्या जोडीला ही दहा जणांची महाराष्ट्रासह विविध राज्यांत जाऊन कॉंग्रेसची बाजू सक्षमपणे हाताळू शकतील, असे पक्षश्रेष्टींना वाटत आहे. यातूनच पुढील काळात पृथ्वीराज चव्हाण यांना राज्यसभेवर ही घेतले जाऊ शकते. एकुणच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसकडून होणाऱ्या मोर्चेबांधणीत पृथ्वीराज चव्हाण महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, असेही पक्षश्रेष्टींना वाटत आहे. यासंदर्भातील मजकूर सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील श्री. चव्हाण यांच्या समर्थकांकडूनही याला दुजोरा मिळू लागला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com