Satara Politics Sharad Pawar - Udayan Raje Shivendra Raje | Sarkarnama

साताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे - शरद पवार 

उमेश भांबरे : सरकारनामा 
गुरुवार, 1 मार्च 2018

साताऱ्यात दोन्ही राजेंचे  सहकार्य मिळवण्यात जो यशस्वी होतो, तोच यशस्वी होतो. ते कसे हे सांगण्याची गरज नाही. साताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे.

सातारा  : " सातारा जिल्ह्यात उसाचा कारखाना सोडला तर या ठिकाणी दुसरा कोणताही कारखाना दिसत नाही. कारखाने कुठे गेले या खोलात मला जायचे नाही . मात्र याची खबरदारी हणमंतराव गायकवाड यांनी घ्यावी. साताऱ्यात दोन्ही राजेंचे  सहकार्य मिळवण्यात जो यशस्वी होतो, तोच यशस्वी होतो. ते कसे हे सांगण्याची गरज नाही. साताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्य करावे, "असा चिमटा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष  खासदार शरद पवार आज काढला.

देगाव-सातारा एमआयडीसीमध्ये सातारा मेगा फुड पार्कचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी  केंद्रीय अन्नप्रक्रीया मंत्री हरसिमरत कौर बादल,  खासदार  उदयनराजे भोसले, खासदार संजय पाटील, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,  जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे, सातारा मेगा फुड पार्कचे प्रवर्तक हणमंतराव गायकवाड, उपाध्यक्ष विजयकुमार चोले, उमेश माने,  उपस्थित होते. 

खासदार शरद पवार म्हणाले, "शेतकऱ्यांचे माल ग्राहकांपर्यंत जाईपर्यंत त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.  त्यामुळे शेत मालावर प्रक्रिया करून त्याचा योग्य मोबदला शेतकऱ्यांना मिळवून देण्याची संकल्पना या फुड पार्कची आहे. महाराष्ट्रातील पहिला फुड पार्क साताऱ्यात बनला याचा आनंद आहे .

साताऱ्यातील एका शेतकरी कुटुंबातील देशातील उद्योजक होतो. देशातील राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवासस्थाची जबाबदारी बीव्हीजी कंपनी पहाते ती व्यक्ती आज कुठे पोहचली हे सांगण्याची आवश्यकता नाही. '

" बीव्हीजी कंपनीने देशातील तीस टक्के तरुणांना रोजगार दिला. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेती माल ग्राहकांपर्यंत पोहचत नसल्याने शेतकऱ्यांचे ५० हजार कोटीचे नुकसान होते. फूड पार्क सारखे प्रकल्प उभे राहिले तर शेतकऱ्यांच्या मालाला दर मिळेल. साताऱ्यात हणमंतराव गायकवाड यांनी साताऱ्यात फूड पार्क प्रकल्प उभारणीसाठी दोन्ही राजेंची मने जिकण्यात यशस्वी झाले.

या फूड पार्कमुळे शेतकऱ्यांच्या शेती मालाला दर मिळणार आहे. त्याच बरोबर ५ हजार तरुणांना रोजगार मिळाला आहे. साताऱ्यातील कारखानदारी कोठे गेली या खोलात मला जायचे नाही. मात्र हणमंतराव गायकवाड यांना सहकार्य करून साताऱ्यात कारखानदारी वाढविण्यासाठी दोन्ही राजांनी सहकार्याची भूमिका घ्यावी "असे शेवटी श्री . पवार यांनी  सांगितले.

संबंधित लेख