Satara Politics Patangrao kadam - Pruthviraj Chavan and Jaykumar Gore | Sarkarnama

सातारा: गोरेंना कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण्यासाठी पतंगराव कदमांचा अल्टिमेट 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 जून 2017

पतंगरावांनी सांगली जिल्ह्याची हद्द सोडून साताऱ्याच्या राजकारणात धडक मारल्याने काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण गटात तीव्र प्रतिक्रया आहेत . 

सातारा: कॉंग्रेसतंर्गत पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला असतानाच भुईंज येथील एका खासगी कार्यक्रमात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी सातारा जिल्ह्यातील कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांना जिल्हाध्यक्ष करावे, त्यासाठी ते स्वत: आग्रही असल्याचे सुतोवाच केले.

पतंगरावांनी सांगली जिल्ह्याची हद्द सोडून साताऱ्याच्या राजकारणात धडक मारल्याने काँग्रेसच्या चव्हाण गटात तीव्र प्रतिक्रया आहेत . 

 जिल्हा कॉंग्रेसवर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार आनंदराव पाटील यांचे असलेले वर्चस्व मोडित काढण्यासाठी पतंगराव कदमांच्या नेतृत्वखाली दुसरा गट सक्रिय होण्याची भिती व्यक्त होत आहे. पतंगराव कदमांच्या या वक्तव्यामुळे कॉंग्रेसजनात तीव्र पडसाद उमटले आहेत . 

विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. जिल्हा परिषदेत ही त्यांना फारसे यश मिळाले नाही. विरोधी बाकावरच त्यांच्या सदस्यांना बसावे लागले आहे. तसेच अकरा पंचायत समितीवरही राष्ट्रवादीने आपला हक्क प्रस्थापित केला आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर कॉंग्रेस पक्ष बॅक फुटवर गेला आहे. 

पक्षाची धुरा माजी मुख्यमंत्री व कऱ्हाड दक्षिणचे आमदार पृथ्वीराज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील यांच्याकडे आहे. पण आनंदराव पाटील यांचे नेतृत्व कॉंग्रेसमधील अनेकांना मान्य नाही. माण-खटावचे कॉंग्रेसचे आमदार जयकुमार गोरे व आनंदराव पाटील यांच्यातही नेतृत्वावरून जमत नाही. त्यामुळे गोरेंनी सांगलीचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरू ठेवली आहे. पण आमदार गोरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे कट्टर समर्थक ही आहेत. 

 कॉंग्रेसमध्ये सुरवातीला युवक कॉंग्रेसचे नंतर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून आनंदराव पाटील साधारण 2004 पासून कार्यरत आहेत. कॉंग्रेस अंतर्गत अनेक गट तट निर्माण झालेले असल्याने कॉंग्रेसची जिल्ह्यात मोठी पडझड झालेली आहे. आता पक्षातंर्गत पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम कॉंग्रेसने सुरू केला आहे. त्यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

लवकरच ब्लॉक कमिटी, जिल्हा कमिटी आणि कार्यकारिणी आणि पदाधिकाऱ्याच्या निवडीसाठी मतदान प्रक्रिया होईल. पण ही प्रक्रिया सुरू असतानाच कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पतंगराव कदम यांनी भुईंज मध्ये टाकलेल्या गुगलीने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मानणारा कॉंग्रेस गट प्रचंड अस्वस्थ झाला आहे. आमच्या जिल्ह्यात त्यांनी लक्ष घालण्याचे कारण काय, असा प्रश्‍न काही पदाधिकारी उपस्थित करत आहेत. 

पतंगराव कदम यांनी थेट आनंदराव पाटील यांच्या  नेतृत्वावर बोट ठेवले आहे. जिल्ह्यातील कॉंग्रेसची घडी विस्कळीत झाली असून पक्षाला पुन्हा गतवैभव मिळवून देण्यासाठी आपण स्वत: लक्ष घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आमदार जयकुमार गोरेंना जिल्हाध्यक्ष करावे, यासाठी ते स्वत: आग्रही राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पतंगराव कदम यांचे हे वक्तव्य थेट पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वाखाला धक्का देणारे आहे. 

आनंदराव पाटील हे पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्याकडून पद काढून घेण्याची भाषा पतंगराव कदमांकडून झाल्याने पक्षातंर्गत निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण आणि आनंदराव पाटील यांच्या विरोधात दुसरा गट सक्रिय होण्याची चाहूल आहे. त्यामुळे कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष निवडीत आनंदराव पाटील यांच्या विरोधात जयकुमार गोरेंचा शड्डू असणार हे निश्‍चित आहे. यावर पृथ्वीराज चव्हाण यांची भुमिका काय राहणार याकडे कॉंग्रेसजनांचे लक्ष लगले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख