satara politcs | Sarkarnama

"किंगमेकर'च्या कुटुंबाचे किती खच्चीकरण करणार ? 

उमेश बांबरे : सरकारनामा ब्युरो 
रविवार, 2 एप्रिल 2017

माण मतदारसंघातील राष्ट्रवादीची अवस्था बिकट झाली आहे. पक्ष स्थापनेपासून बरोबर असलेल्यांना कोणी निर्णय प्रक्रियेत घेत नाही. खुद्द पक्षप्रमुखांनी सांगूनही पोळ कुटुंबीयांना डावलले गेल्याने राष्ट्रवादीत वेगळा संदेश गेला आहे. त्याचा परिणाम आगामी विधानसभा निवडणुकीवर होण्याची दाट शक्‍यता आहे. 

सातारा : जिल्हा परिषदेच्या सभापती निवडीत राष्ट्रवादीचे नेते, माजी आमदार कै. सदाशिवराव पोळ यांच्या सुनेला डावलून कोरेगाव मतदारसंघातील महिलेला सभापती पद दिले गेले. माणचे किंगमेकर कै. सदाशिवराव पोळ यांच्या हयातीत व त्यानंतर त्यांच्या घराण्याची उपेक्षा करण्याचा डाव राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून खेळला जात असल्याचे यानिमित्ताने पुन्हा प्रत्ययास आले. 

माण तालुक्‍याचे दिवंगत नेते सदाशिवराव पोळ ऊर्फ तात्या हे किंगमेकर म्हणूनच जिल्ह्यात ओळखले जात होते. माण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने उमेदीच्या वयात त्यांना निवडणूक लढवता आली नाही, मात्र त्यांना हवा तो आमदार त्यांनी अनेकवेळा निवडून आणून दाखवला. विष्णूपंत सोनावणे, धोंडिराम वाघमारे, तुकाराम तुपे, संपत अवघडे हे आमदार त्यांनीच निवडून आणले. आमदार ठरविणारा नेता म्हणून त्यांना किंगमेकर म्हटले जाई. 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जे नाव सांगतील त्याला निवडून आणण्यासाठी तात्या नेहमी अग्रेसर राहिले. सलग 36 वर्षे जिल्हा परिषदेचे सदस्य, सलग 48 वर्षे सातारा जिल्हा बॅंकेचे संचालक असे विक्रम करूनही त्यांच्या कर्तृत्वाला शेवटपर्यंत न्याय मिळाला नाही. केवळ 1998-1999 मध्ये जिल्हा परिषदेचे केवळ सव्वा वर्षे
उपाध्यक्ष झाले. तर अगदी शेवटी शेवटी एक वर्षे जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद तात्यांना मिळाले. 2002 मध्ये विधान परिषदेवर जाण्याची त्यांना संधी मिळाली. पण मतदारसंघाची पुनर्रचना झाली, आरक्षण बदलले पण ते माणचे आमदार होऊ शकले नाहीत. राष्ट्रवादीतील युवा नेत्यांच्या गद्दारीमुळे त्यांचा पराभव झाला. हा पराभव
घडवून आणण्यात शेजारच्या तालुक्‍यातील राष्ट्रवादी नेत्याचा हात होता. 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उघडपणे विरोध करून त्यांचा पराभव घडवून आणला. कायम किंगमेकरच्या भूमिकेत राहणारे तात्या स्वतः: किंग होऊ शकले नाहीत. ही खंत त्यांच्या कार्यकर्त्यांच्या काळजात नेहमीच सलत राहिली आहे. 

गेल्या महिन्यात जिल्हा परिषद निवडणुकांचा निकाल लागल्यापासून महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदासाठी फक्त गोंदवले बुद्रूक गटातून निवडून आलेल्या तात्यांच्या थोरल्या स्नुषा डॉ. भारती संदीप पोळ यांचे नाव चर्चेत होते. तात्यांच्या पश्‍चात त्यांच्या घराला न्याय देणार असा शब्द माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी मध्यंतरी दिला होता. सभापती पदासाठी डॉ. पोळ यांच्या नावाला जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील नेतेमंडळींचा विरोध नव्हता. त्यामुळे त्यांनाच पद मिळणारच याची खात्री होती. पण, ऐनवेळी डॉ. भारती पोळ यांचा पत्ता कट झाला. सर्वार्थाने योग्य असतानाही ऐनवेळी वरिष्ठांनी डावलण्याचे तात्यांनी भोगलेले भोग सुनेलाही भोगावे लागत आहेत, अशीच प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहे.

सभापती पद मिळावे म्हणून तात्यांच्या कुटुंबाने शरद पवार यांची भेट घेऊन तशी इच्छाही व्यक्त केली होती. त्यावेळी पवार साहेबांनी तसा शब्दही दिला होता. पण प्रत्यक्ष निवडीवेळी वेगळेच नाव पुढे आणले गेले. पोळ कुटुंबाच्या राजकारणाचे पुनरुज्जीवन होऊ नये, याची पूर्ण खबरदारी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाने घेतली. विधानसभेचे संभाव्य गणिते मांडताना ही चाल खेळली गेली असलीतरी पोळ कुटुंबीयांच्या
उपद्रवाकडे दुर्लक्ष करून तालुक्‍याचे राजकारण पुढे जाऊ शकणार नाही. पोळतात्यांचा वारसा सांगणारे त्यांचे वारसदार प्रतिक्रिया म्हणून कधी आणि कोणती कृती करणार, हे पाहणे आता औत्सुक्‍याचे ठरणार आहे. 

 

संबंधित लेख