satara ncp appointment issue | Sarkarnama

1999 पासून बालेकिल्ला राखलेल्या साताऱ्यात राष्ट्रवादीला निष्ठावंत सापडलेच नाहीत? 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

राष्ट्रवादीला 1999 पासून आजपर्यंत सातारा जिल्ह्याने ताकद दिली आणि बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. पण प्रदेश कार्यकारिणीत पक्षातील निष्ठावंतांना संधी द्यावी, याबाबत जिल्ह्यातील एकाही नेत्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे आग्रह धरला नाही, अशी खंत निष्ठावंत कार्यकर्ते व्यक्त करू लागले आहेत. 

सातारा : राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यातील केवळ दोनच पदाधिकाऱ्यांना प्रदेश कार्यकारिणीत स्थान दिले आहे. अविनाश मोहिते यांची प्रदेश सरचिटणीसपदी तर कार्यकारिणी सदस्यपदी सुरेंद्र गुदगे याचे नाव आहे. पक्षातील निष्ठावंतांना मात्र, या निवडीत स्थान दिले नसल्याने राष्ट्रवादीच्या गोटात नाराजी पसरली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रदेश कार्यकारिणीतील पदाधिकारी व सदस्यांची यादी काल (ता. 21) जाहीर केली. यामध्ये 26 उपाध्यक्ष, 28 सरचिटणीस, एक सहकोषाध्यक्ष, संघटन सचिव एक तर कार्यकारिणी सदस्य दहा अशी यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. 

या कार्यकारिणीवर सातारा जिल्ह्यातील अविनाश मोहिते यांची प्रदेश सरचिटणीसपदी तर कार्यकारिणी सदस्यपदी सुरेंद्र गुदगे या दोघांचीच नावे आहेत. सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असून येथील केवळ दोनच पदाधिकाऱ्यांना प्रदेश पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. यातही बाहेरून पक्षात आलेल्यांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे पक्षातील निष्ठावंतांत नाराजी पसरली आहे. 

 

संबंधित लेख