satara ncp | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता राज्य सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार - मुख्यमंत्री
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग तयार करणार - मुख्यमंत्र्यांची घोषणा

पक्षविरोधकांना सामावून घेण्यामुळे राष्ट्रवादीत अस्वस्थता 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 12 एप्रिल 2017

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्यांना कामकाजाचे प्रशिक्षण देण्यासाठी या आठवड्यात पुणे येथील यशदा संस्थेत राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे नियोजन झाले आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यातील सदस्यांचे प्रशिक्षण झाले. आता सातारा जिल्ह्यातील सदस्यांचे प्रशिक्षण होणार आहे. 

सातारा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षविरोधी काम केलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पक्षातून बाजूला करण्याची भुमिका सर्वच प्रमुख नेत्यांनी घेतली. पण अद्यापपर्यंत त्यावर कोणतीही कार्यवाही झालेले नाही. उलट आपले ही आपलेच आणि विरोधातील ही आपलेच असे म्हणत सर्वांना पोटाखाली घेण्याचा प्रकार राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सुरू आहे. या प्रकारामुळे पक्षातील निष्ठावंतात मात्र तीव्र नाराजी पसरली आहे. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या दरम्यान, राष्ट्रवादीकडून तिकिट मिळणार नाही, हे ओळखून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. याचा परिणाम त्या त्या गट, गणात राष्ट्रवादीला फटका बसला. निवडणुकीनंतर पक्षाच्या नवीन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या सत्काराचा कार्यक्रम माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी जिल्ह्यातील नेत्यांनी आपल्या भाषणात पक्षातील गद्दारांना हाकलून देण्याची भाषा केली होती. तसेच या गद्दारांची यादीच तयार आहे. त्यांना पक्षातून कायमचे दूर करण्याचे संकेत दिले होते. पण त्यानंतर आजपर्यंत राष्ट्रवादीतील एकाही नेत्याने निवडणुकीत पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर
कारवाई करण्याची भुमिका घेतलेली नाही. त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली आहे.

नेतेमंडळी पक्षविरोधी काम करणाऱ्यांना पाठीशी घालत असल्याची भावना या कार्यकर्त्यांत निर्माण झाली आहे. पक्षविरोधी काम करूनही अनेक जण आजही विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या विरोधात भुमिका घेण्यास ना 
जिल्हाध्यक्ष सुनील माने तयार आहेत ना नेते मंडळी. त्यामुळे संबंधित कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादीचेच असल्यासारखे वावरू लागले आहेत. जून ते ऑगस्ट या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागू होण्यापूर्वी पक्षविरोधी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना पक्षातून हद्दपार करावे अन्यथा हेच कार्यकर्ते पुन्हा ग्रामपंचायत निवडणुकीतही अडचण निर्माण करतील, अशी अपेक्षा निष्ठावंतांतून व्यक्त होत आहे. 

 

संबंधित लेख