सातारा जिल्ह्यात आमदारकीसाठी भाजपचे पाच उमेदवार निश्‍चित! 

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने आतापासूनच विधानसभेची रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंतजिल्ह्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच मतदारसंघात उमेदवार निश्‍चित करत आघाडी घेतली आहे. या उमेदवारांना काम सुरू करण्याचे आदेश देण्याबरोबर अन्य दोन मतदारसंघांत उमेदवार आयात करण्यासाठी पक्षाने गळ टाकले आहेत.
सातारा जिल्ह्यात आमदारकीसाठी भाजपचे पाच उमेदवार निश्‍चित! 

सातारा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाने आतापासूनच विधानसभेची रणनिती आखण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत 
जिल्ह्यातील विधानसभेच्या आठपैकी पाच मतदारसंघात उमेदवार निश्‍चित करत आघाडी घेतली आहे. या उमेदवारांना काम सुरू करण्याचे आदेश देण्याबरोबर अन्य दोन मतदारसंघांत उमेदवार आयात करण्यासाठी पक्षाने गळ टाकले आहेत. 

सध्याची राजकीय परिस्थिती पाहता मुदतपूर्व निवडणूका लागण्याची शक्‍यताही वर्तविली जात आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसने हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून राज्यभर वातावरण ढवळून काढले आहे. शिवेसनेच्याही कुरबुरी वाढलेल्या आहेत. अशा परिस्थितीत निवडणुकीला भक्कमपणे सामोरे जाण्यासाठी पक्षाची सर्वच पातळ्यांवर तयारी सुरू आहे. अशातच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अत्यंत गुप्तपणे पक्षाची विविध मतदारसंघातील उमेदवारांची चाचपणी व त्यांच्या विजयाच्या शक्‍यता तपासल्या आहेत. 

विविध आराखड्यांवर चाचपणी करून उमेदवार निश्‍चितीची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रक्रियेत सध्या स्वबळाचाच विचार आहे. मागील निवडणुकांत बरोबर असलेले मित्रपक्ष या वेळी साथ देतीलच अशी परिस्थीती नाही. राजू शेट्टी बाहेर पडले आहेत. धनगर आरक्षण देणे पक्षाला अद्याप जमलेले नाही. त्यामुळे धनगर समाजाचा रोष वाढत चालला आहे. त्यामुळे महादेव जानकरही बरोबर राहतील कि नाही आणि राहिले तर समाज त्यांना कितपत साथ देईल याची भाजपला शंका आहे. त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्ष व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देऊ केलेल्या जागांवरही भाजपचेच उमेदवार निश्‍चित केले जात आहेत. 

सातारा जिल्ह्यातील आठ मतदारसंघांची चाचपणीही नुकतीच केली आहे. त्यामध्ये पाच जागांवर उमेदवार निश्‍चित करण्यात आली. वरिष्ठ पातळीवरून आलेल्या हे नियोजन नुकतेच जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्या उपस्थित संबंधीत उमेदवारांची बैठकीत सांगण्यात आले. तसेच संबंधीत उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

माण-खटाव मतदारसंघातून माजी आमदार डॉ. दिलीप येळगांवकर, कोरेगाव मतदारसंघातून महेश शिंदे, सातारा- जावळी मतदारसंघातून दीपक पवार, कऱ्हाड उत्तरमधून मनोज घोरपडे, तर कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांची नावे निश्‍चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

तीन ठिकाणी आयात उमेदवार 
उर्वरित तीन मतदारसंघात अद्याप पक्षाची चाचपणी सुरू आहेत. त्यापैकी फलटण मतदारसंघ राखीव आहे. तेथे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या पगडा जास्त आहे. त्यामुळे तेथील उमेदवाराबद्दल ऐनवेळी निर्णय घेतला जाणार आहे. उरलेल्या पाटण व वाई- खंडाळा- महाबळेश्‍वर या मतदारसंघात पक्षाने इतर पक्षाचे उमेदवार आपल्याकडे खेचण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पाटणमध्ये शंभूराज देसाई यांचे तर, वाईमधून मदन भोसले यांचे मन वळविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com