Satara Mhada MP's Journey with Pawar | Sarkarnama

सातारा, माढासाठीच खासदारांचा प्रवास

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

आगामी लोकसभा निवडणुकीत माढा व सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचे उमेदवार राष्ट्रवादी बदलणार यावर विधान परिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिक्कामोर्तब झाले. पण अजुनही वेळ गेलेली नाही, हे ओळखून माढा व साताऱ्याच्या खासदारांनी काल रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून पुणे ते सातारा एकत्र प्रवास केला. हा प्रवास राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना धक्का देणारा असला तरी सातारा, माढासाठीच दोन खासदारांचा हा प्रवास झाल्याचे चित्र आहे.

सातारा : आगामी लोकसभा निवडणुकीत माढा व सातारा लोकसभा मतदारसंघातील खासदारकीचे उमेदवार राष्ट्रवादी बदलणार यावर विधान परिषद व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निकालानंतर शिक्कामोर्तब झाले. पण अजुनही वेळ गेलेली नाही, हे ओळखून माढा व साताऱ्याच्या खासदारांनी काल रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमासाठी आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गाडीतून पुणे ते सातारा एकत्र प्रवास केला. हा प्रवास राष्ट्रवादीच्या जिल्ह्यातील नेत्यांना धक्का देणारा असला तरी सातारा, माढासाठीच दोन खासदारांचा हा प्रवास झाल्याचे चित्र आहे.

खासदार उदयनराजे भोसले व विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबाबत राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांत नाराजी आहे. खासदार उदयनराजेंची पक्षातील कोणालाही न जुमानण्याची वृत्ती तर विजयसिंह मोहितेंना स्थानिकांचा विरोध आहे. सातारा आणि माढा दोन्हीकडे शरद पवार यांना मानणारे सर्वजण असले तरी अजित पवार यांना मानणारा स्वतंत्र गट आहे. विद्यमान दोन्ही खासदार हे शरद पवार यांना मानणारे आहेत. त्यांचे अजित पवार यांच्याशी फारसे जुळत नाही.

सातारा-सांगली विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी राष्ट्रवादीतील स्थानिक नेत्यांनी खासदारांविषयी पवार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्यावेळेपासून खासदार उदयनराजेंना पक्षातील नेत्यांनी बाजूला ठेवले. अगदी आगामी लोकसभेसाठी उमेदवार बदलण्याच्या निर्णयापर्यंत निर्णय गेला. पण पक्षाच्या पुणे, मुंबईत होणाऱ्या बैठकींना उपस्थित राहून उदयनराजे पवार यांच्या संपर्कात राहिले.

तरीही जिल्ह्यातील नेत्यांच्या मनात आजही साताऱ्यासाठी वेगळाच उमेदवार असावा अशी भूमिका आहे. त्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मंडळी प्रयत्नशील आहेत. अशातच शरद पवारांसोबत पुणे ते सातारा प्रवास करून खासदार उदयनराजे व विजयसिंह मोहिते पाटील यांनी सर्व राजकिय चर्चांना 'व्टिस्ट' करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रवासातून या दोन खासदारांनी आगामी लोकसभेसाठी सातारा, माढ्यातून आम्हीच आहोत, हे दाखविण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जाते.

पण प्रत्यक्षात खासदार शरद पवार हे पक्षातील स्थानिक नेत्यांना विचारल्या शिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत. त्यामुळे या प्रवासानंतरही सातारा राष्ट्रवादीतील स्थानिक नेतेमंडळी साताऱ्याचा उमेदवार बदलण्याच्याच मुद्‌द्‌यावर ठाम राहणार का, हा प्रश्‍न महत्वाचा आहे.

 

 

संबंधित लेख