Satara Ganesh Immerssion issue due to Udayanraje | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

कल्पनाराजे भोसले, उदयनराजेंमुळेच गणेश विसर्जनाचा प्रश्‍न गंभीर - शिवेंद्रराजे

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 सप्टेंबर 2018

राजमाता कल्पनाराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळेच साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. घराण्याविषयी असलेल्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन मी महाराज, मी तेरावा वंशज असे दाखवून खासदार लोकांची गळचेपी करत आहेत - शिवेंद्रराजे

सातारा : ''राजमाता कल्पनाराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यामुळेच साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. याचे स्पष्टीकरण त्यांनी द्यावे. घराण्याविषयी असलेल्या प्रेमाचा गैरफायदा घेऊन मी महाराज, मी तेरावा वंशज असे दाखवून खासदार लोकांची गळचेपी करत आहेत. त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागायला हवी आणि गणेश भक्तांच्या भावनांशी खेळणे थांबवावे,'' अशी टीका साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. 

खासदार उदयनराजेंनी गणेश मूर्ती विसर्जनाबाबत घेतलेल्या भुमिकेमुळे गणेश मंडळे आणि सातारकर कसे अडचणीत आले आहेत, याबाबतची माहिती देताना आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ''गणेश मूर्ती विसर्जनाचा प्रश्‍न सोडविणे ही पालिकेची जबाबदारी असताना त्यांना ते जमले नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांनी यातून मार्ग काढून सर्वांच्या भावना लक्षात घेऊन मध्यवर्ती ठिकाणी बुधवार नाक्‍याजवळ कृत्रिम तळे काढण्यास सुरवात केली आहे. त्याबद्दल मी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांचे साताकरांच्यावतीने आभार मानतो, त्यांनी लोकांची गैरसोय होऊन दिली नाही. पण मुळात हा प्रश्‍न निर्माण झाला, तो खासदार व त्यांच्या आईसाहेबांमुळेच."

ते पुढे म्हणाले, "राजमाता कल्पनाराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले या दोघांनी जिल्हा प्रशासनाला जे पत्र दिले आहे. त्यामध्ये मंगळवार तळ्यात गणेश विसर्जन करून देऊ नये, असे म्हटले आहे. तर दुसरीकडे खासदार आमच्या मालकीचे तळे असून येथेच विसर्जन होणार असे म्हणत आहेत. या पत्रांबाबत त्यांनी सातारकरांना स्पष्टीकरण देणे गरजेचे आहे. सप्टेंबर 2015 मध्ये उदयनराजेंच्या स्वीकृत नगरसेविका हेमांगी जोशी यांनी दिलेल्या विनंती पत्रात मंगळवार तळे खासगी मिळकत असली, तरी सध्याची पाणीटंचाई लक्षात घेऊन तळ्याची दुरूस्ती व पाण्याचा योग्य वापर करण्याबरोबरच तळ्यात कसल्याही विसर्जनास प्रतिबंद करावे, अशी सूचना केली होती. एकीकडे हे तळे खासदार माझ्या मालकीचे म्हणतात आणि दुसरीकडे नगरसेविका असे पत्र देतात. हा त्यांचा दुटप्पी पणाच आहे. केवळ दंडेलशाही आणि मी म्हणेल तसे झाले पाहिजे, यातूनच हे पत्र त्यांनी दिले आहे."

"आज जो गणेश विसर्जनाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे तो खासदार उदयनराजे भोसले व राजमाता कल्पनाराजे भोसले यांच्यामुळे झाला आहे. दोन्ही पत्राबाबत खासदारांनी स्पष्टीकरण द्यावे, तुम्ही गणेश भक्तांच्या भावनांशी खेळत आहात. तुमच्या हातात काही राहिलेले नाही, म्हणून ते आता जिल्हा प्रशासनावर सर्व काही ढकलत आहेत. घराण्याविषयी असलेल्या प्रेमाचा किती गैरफायदा घ्यायचा, असा प्रश्‍न शिवेंद्रसिंहराजेंनी उपस्थित केला आहे. मी महाराज, मी तेरावा वंशज असे दाखवून खासदार लोकांची गळचेपी करत आहेत. त्याबद्दल त्यांनी जनतेची माफी मागायला हवी. सातारकरांना काय खरे काय खोटे हे एकदा कळू देत. त्यासाठी त्यांनी दोन्ही पत्रांचे स्पष्टीकरण द्यावे." असे आव्हान शिवेंद्रराजे यांनी दिले. 

नगरसेवक, खासदारांचे कमिशनवर लक्ष
सध्या खासदारांच्या सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांचे लक्ष कमिशनवर व खासदारांचे लक्ष स्वत:च्या निवडणुकीवर आहे, असा टोला लगावून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, ''खासदारांना लोकसभा लढवायची आहे. तसेच साशा कंपनीकडून किती पदरात पडतयं हेही पहायचे आहे. या कंपनीकडून तुला काय मिळाले आणि मला काय मिळाले, यावरच त्यांचे व त्यांच्या नगरसेवकांचे लक्ष आहे. कुणाला कमी व कुणाला जास्त कमिशन दिले यावरच सातारा विकास आघाडीचे नगरसेवक टपलेले असतात. सातारा शहरात अनेक स्थानिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. स्वाईन फ्लू, खड्डे भरण्याकडे पालिकेचे दूर्लक्ष झालेले आहे. कराचे स्वत: आणि दुसऱ्यावर दोष द्यायचा हे चालले आहे. गेली 40 वर्षात साताऱ्यातील गणेश विसर्जनाचा प्रश्‍न कधीहीही निर्माण झाला नव्हता. पण पालिकेत खासदारांच्या सातारा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर तुघलघी कारभार सुरू झाला आहे. त्यातूनच सातारकर व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना वेठीस धरले जाते ही दुर्दैवी बाब आहे." 

स्टंटबाजी करण्यापेक्षा कामे करा....
''तुम्ही खासदार आहात, तुम्ही केंद्रात प्रश्‍न मांडा केवळ स्टंटबाजी करण्यापेक्षा खासदारांनी लोकांच्या भावना समजून निर्णय करून घ्यावेत. केंद्र सरकारच्या अखत्यारितील प्रश्‍न त्यांनीच सोडवायला हवेत. केवळ गणेश भक्तांत संघर्ष निर्माण करून देणे हे लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना शोभणारे नाही,'' असा टोला शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला आहे. 
 

संबंधित लेख