satara fadavnis shambhuraj friendship politics | Sarkarnama

फडणवीस- शंभूराज देसाई मैत्रीचे रुपांतर भाजप प्रवेशात होणार? 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 8 मार्च 2018

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्यातील मैत्री सर्वज्ञात आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे पाटण दौरे होत आहेत. यानिमित्ताने आमदार देसाईंचे मन वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात आहे. 

सातारा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पाटणचे शिवसेना आमदार शंभूराज देसाई यांच्यातील मैत्री सर्वज्ञात आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे पाटण दौरे होत आहेत. यानिमित्ताने आमदार देसाईंचे मन वळविण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याची चर्चा सध्या राजकिय वर्तुळात आहे. 

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात माण, कऱ्हाड आणि पाटण मतदारसंघात 2014 ला राष्ट्रवादीला पराभव पत्कारावा लागला आहे. पाटणमध्ये गटांचे राजकारण मोठे आहे. पारंपरिक राजकीय शत्रू असलेले माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर आणि आमदार देसाई गट यांच्यातच सर्व निवडणुका होतात. पाटणकर हे पवारांचे समर्थक असून ते राष्ट्रवादीत आहेत. तर आमदार देसाई गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत आहेत. 

देसाई शिवसेनेत असले तरी देसाई गट म्हणूनच त्यांचे पाटण तालुक्‍यात राजकारण चालते. देसाईंचा मतदारसंघात 24 तास संपर्क असून त्यांचे आमदार म्हणून असलेले कामही चांगले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शंभूराज देसाई यांच्यातील मैत्री सर्वज्ञात आहे. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांचे पाटणला येणे-जाणे अलिकडे वाढले आहे. मुख्यमंत्र्यांशी त्यांची जवळीक पाहून ते भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. पण आजपर्यंत तरी हा केवळ चर्चेचाच विषय ठरला आहे. भाजपला यावेळेस पुन्हा सत्ता राखण्यासाठी बेरजेच्या राजकारणावर भर दिला आहे. त्याचा वापर सर्वच मतदारसंघात केला जात आहे. आता मुख्यमंत्र्यांशी सर्वाधिक जवळीक असलेल्या आमदार शंभूराजेंसाठीही भाजपकडून प्रयत्न होणार आहेत. भाजपच्या या रणनितीला शंभूराजेंची साथ मिळणार का, याचे औत्सुक्‍य आहे. 

येत्या रविवारी (ता.11) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाटणच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांच्या हस्ते लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे शासनाच्या वतीने उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र दौलत या शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन व दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांना मानपत्र अर्पण सोहळा आणि नळपाणी योजनेचे भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास डझनभर मंत्रीही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांसह भाजपचे मंत्रीगण आमदार शंभूराज देसाईंचे मन वळविण्यात यशस्वी होणार का, याची उत्सुकता आहे.  

संबंधित लेख