satara dpc | Sarkarnama

राष्ट्रवादी भाजपबरोबर; उदयनराजे सेना-कॉंग्रेससोबत! 

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 7 ऑगस्ट 2017

सातारा जिल्हा नियोजन समितीच्या मतदानासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळे सर्व विरोधकांना बाजूला ठेवत भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने शंभूराज देसाई, शिवसेना आणि कॉंग्रेससोबत आघाडी करत नियोजन समितीत आपले उमेदवार सेफ केले.

सातारा : जिल्हा नियोजन समितीच्या मतदानासाठी कॉंग्रेसच्या नेत्यांच्या धरसोड वृत्तीमुळे सर्व विरोधकांना बाजूला ठेवत भाजपने ऐनवेळी राष्ट्रवादीशी हात मिळवणी केली. उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने शंभूराज देसाई, शिवसेना आणि कॉंग्रेससोबत आघाडी करत नियोजन समितीत आपले उमेदवार सेफ केले. दरम्यान, बुधवारी (ता. 9) निकालानंतर कोणी कोणाची मते फोडली आणि कोणी कोणाला मदत केली, हे स्पष्ट होणार आहे. 

कॉंग्रेससह सर्व विरोधकांची मोट बांधण्यात यश न आल्याने कॉंग्रेसच्या नेत्यांचे राष्ट्रवादीसोबतचे जागावाटप फिस्कटले. त्यामुळे ऐनवेळी रात्री उशीरा विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पुण्याचे पालकमंत्री गिरिष बापट, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची चर्चा झाली. या चर्चेनंतर कऱ्हाडात रात्री उशीरा झालेल्या भाजपच्या बैठकीनंतर मंत्री चंद्रकांत पाटील भाजपच्या चार पदाधिकाऱ्यांना आपण राष्ट्रवादीसोबत जात असल्याचे सांगितले. जिल्हा परिषद मतदारसंघातील रेश्‍मा शिंदे यांच्या जागेवरून चर्चा आडली होती. पण त्यावर ही तोडगा काढून ही जागाही राष्ट्रवादीने भाजपला सोडण्याचा निर्णय घेतला. याबाबत कोठेही चर्चा न करता थेट सकाळी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून कोणाला मतदान करायचे याची चिठ्ठी आली. यावर भाजपने मनोज घोरपडे, अनिल देसाई आणि विक्रम पावसकर, धनंजय जांभळे यांच्यावर जबाबदारी सोपविली आणि राष्ट्रवादीचे भाजपसोबत टायअप झाले. यामुळे भाजपला तीन जागांचा फायदा होणार आहे. 

कॉंग्रेससोबत जाताना भाजपला केवळ एक जागा दिली जाईल, असे सांगण्यात आले होते. राष्ट्रवादी सोबत जाताना भाजपला तीन जागा मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाणे पसंत केले. सर्व लक्ष केंद्रीत करूनही कोरेगावातील राष्ट्रवादीची मते फुटली. तर कऱ्हाड भाजपची मते फुटली. त्यामुळे दोन्हीकडच्या नेत्यांना अक्षरश: घाम फुटला. कॉंग्रेसची वाईतील मते राष्ट्रवादीने फोडल्याची चर्चा होती. 

खासदार उदयनराजेंच्या सातारा विकास आघाडीने आमदार शंभूराज देसाई, शिवसेना आणि कॉंग्रेस सोबत हातमिळवणी केली. येथे सर्वांना एका जागेचा फायदा होणार आहे. सकाळी आमदार शंभूराज देसाईंनी खासदार उदयनराजेंची त्यांच्या जलमंदीर निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली. दुपारी मतदानासाठी खासदार उदयनराजे भोसले गाड्यांचा ताफा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले. त्यावेळी त्यांच्या गाडीत साविआच्या सदस्यांसोबत आमदार देसाईंचे सदस्य होते. दुपारपासून कऱ्हाडचे जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील उंडाळकर हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित होते. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र, अस्वस्थता जाणवत होती. त्यांना कोणी कोणी मदत केले, हे आता निकालातच स्पष्ट होणार आहे. 

संबंधित लेख