Satara DCC MLA Jaykumar Gore makes allegations | Sarkarnama

चुकीच्या भरती प्रक्रियेतून जमविली कोट्यवधींची माया -जयकुमार गोरे

सरकारनामा  
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत चुकीच्या पद्धतीने नोकरभरती करुन कोट्यावधींची माया जमवून राजकारण करणाऱ्यांना न्यायव्यवस्थेने चपराक दिली आहे. खऱ्या अर्थाने पात्र असणाऱ्या गोरगरिबांच्या मुला, मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा बॅंकेचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत, अशी प्रतिक्रिया आजच्या भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या आदेशावर आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

मलवडी  : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत चुकीच्या पद्धतीने नोकरभरती करुन कोट्यावधींची माया जमवून राजकारण करणाऱ्यांना न्यायव्यवस्थेने चपराक दिली आहे. खऱ्या अर्थाने पात्र असणाऱ्या गोरगरिबांच्या मुला, मुलींना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्हा बॅंकेचे दरवाजे पुन्हा उघडले आहेत, अशी प्रतिक्रिया आजच्या भरती प्रक्रिया रद्द करण्याच्या आदेशावर आमदार जयकुमार गोरे यांनी दिली.

दरम्यान, जिल्हा बॅंकेत चुकीच्या पध्दतीने केलेल्या नोकरभरती विरोधात मी आवाज उठविला होता. विधानपरिषदेचे सभापती आणि सहा आमदारांची ताकद व दबाव असुनही अखेर सत्याचाच विजय झाला असेही ते म्हणाले.

महाराष्ट्राच्या सहकार विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांनी सातारा जिल्हा बॅंकेने राबविलेली सेवक भरती प्रक्रिया रद्द करण्याबाबत दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर बोलताना आमदार गोरे म्हणाले, सेवक भरती करताना सत्ताधारी संचालक मंडळाने मनमानी कारभार केला होता. पैसे दिलेल्या परिक्षार्थींची निवड करण्यात येवून त्यांना नियुक्तीपत्रे देवून खऱ्या प्रामाणिक आणि पात्र परिक्षार्थींना डावलण्यात आले होते. चुकीच्या सेवक भरती प्रक्रियेविरोधात मी विधीमंडळात तसेच प्रसारमाध्यमांसमोर आवाज उठविला होता. 

मुख्यमंत्र्यांनी तसेच सहकार मंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. मात्र सत्ताधारी संचालक मंडळाने आपली ताकद वापरुन चौकशीच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला होता. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वरिष्ठ पातळीवरुन चौकशी झाल्यानंतर भरती प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने झाल्याचे समोर आले आणि सहकार विभागाच्या मुख्य सचिवांनी बॅंकेने केलेली सेवक भरती प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हा बॅंकेतील ज्या संचालकांच्या खाजगी बॅंका आहेत त्या बॅंकांचे दिवाळे निघाले आहे. जिल्हा बॅंकही त्या मार्गाने जाऊ नये म्हणून माझी लढाई सुरु आहे. बॅंकेची प्रतिष्ठा जपण्यासाठी वाट्टेल ते करायला मी तयार आहे. बॅंकेच्या अनागोंदी कारभाराबाबतचे प्रलंबित असणारे निकाल लवकरच लागतील आणि संचालक मंडळ तुरुंगात जाईल. सीसीटीव्ही, संगणक सॉफ्टवेअर, नोकरभरती घोटाळ्यामुळे नाशिक बॅंक बरखास्त झाली. सातारा जिल्हा बॅंकेच्या संचालक मंडळाची कुकर्मे तर त्यापेक्षा भयानक आहेत. त्यामुळे शासनाला लवकरच निर्णय घ्यावा लागेल.

सरकाळेंचा मोठा वाटा
चुकीच्या सेवक भरतीत बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे यांचाही मोठा सहभाग असून कुटूंबातील तसेच ओळखीच्या व्यक्तींना नोकरी देण्यात आली आहे. त्यांच्यावरही लवकरच फौजदारी खटला दाखल करणार आहे. संबधीत यंत्रणेवरही गुन्हा दाखल करण्यासाठी हायकोर्टात पुन्हा याचिका दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सातारा जिल्हा बॅंकेचा अनागोंदी कारभार आणि चुकीच्या सेवक भरतीविरोधात मी आवाज उठवला की बॅंकेचे अध्यक्ष थातुरमातुर स्पष्टीकरण देतात. आता तर अप्पर मुख्य सचिवांनी भरती प्रक्रिया रद्द केली आहे. आता नव्याने आणि पारदर्शीपणे सदर प्रक्रिया राबवावी लागणार आहे. उलटसुलट गोष्टी घडत असलेल्या जिल्हा बॅंकेत पीएनबी सारखा महाघोटाळा होवू नये म्हणजे मिळवली असा टोलाही आमदार गोरे यांनी लगावला.

संबंधित लेख