satara congress meeting at madan bhosale residence | Sarkarnama

मदन भोसले यांच्याकडील बैठकीत पृथ्वीराज चव्हाणांनी वाद मिटवले! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

जिल्हा कॉंग्रेसमधील वाद युवकमध्ये नको अशी भुमिका सर्वांनी घेतली.

सातारा : गट-तट आणि हेव्यादाव्यात अडकलेले जिल्ह्यातील कॉंग्रेसचे नेते युवकच्या निवडणुकीच्या निमित्ताने एक झाले आहेत. कधी नव्हे ते वाईचे माजी आमदार मदन भोसले पक्षात सक्रिय होऊ लागले आहेत. ही एकजूट आगामी निवडणुकीसाठी सर्वांच्याच फायद्याची ठरणार आहे. युवक च्या जिल्हाध्यक्षपदी विराज शिंदे यांची निवड झाली आहे. 

सत्ता गेली आणि जिल्ह्यातील कॉंग्रेसमध्ये वादाचे वादळ सुरू झाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत असतानाच जिल्हाध्यक्ष पदावरून कॉंग्रेसचे माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे आणि आमदार आनंदराव पाटील या दोघांत तात्विक वाद सुरू झाला. यातून एकमेकांना आव्हान देण्यापर्यंत त्यांची मजल गेली. हा वाद मिटविताना कोणाची बाजू घ्यायची असा प्रश्‍न पृथ्वीराज चव्हाणांपुढे निर्माण झाल्याने त्यांनी याकडे थोडे दूर्लक्ष केले. 

हा वाद जिल्ह्यात न थांबता थेट प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांपर्यंत गेला. त्यांनी आपसातच हा मिटविण्याची सूचना केली. त्यानंतरही एकमेकांवर विविध कार्यक्रमांतून टीका सुरूच होती. याच दरम्यान, युवक कॉंग्रेसची निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली. यामध्ये जिल्हा कॉंग्रेसमधील वाद युवकमध्ये नको अशी भुमिका सर्वांनी घेतली आणि त्यादृष्टीने बांधणी सुरू झाली. यासाठी युवक कॉंग्रेसचे दयानंद भोसले यांनी सर्व नेत्यांना एकत्र करण्याची जबाबदारी घेतली. त्यानुसार माजी आमदार मदन भोसले यांच्या घरी बैठक झाली. या बैठकीस पृथ्वीराज चव्हाण, जयकुमार गोरेंसह कॉंग्रेसचे सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. त्यांनी सर्वांनी वादमुक्त युवक कॉंग्रेसची नवीन कार्यकारिणी करण्याची भुमिका घेतली. त्यानुसार युवक कॉंग्रेसची निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात होऊन युवकच्या जिल्हाध्यक्ष पदी विराज शिंदे विजयी झाले आहेत. त्यांना 2556 मते मिळाली असून विरोधात असलेले शैलेश चव्हाण यांना1719 मते मिळाली आहेत. विराज शिंदे हे माजी आमदार मदन भोसले यांचे समर्थक आहेत.  

संबंधित लेख