satara congress | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

हेमामालिनी या मथुरा येथून निवडणूक लढविणार
नरेंद्र मोदी वाराणशीतून, अमित शहा हे गांधीनगरमधून, नितीन गडकरी नागपूरमधून आणि राजनाथसिंह हे लखनौमधून निवडणूक लढविणार

साताऱ्याची कॉंग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर ! 

उमेश बांबरे 
शनिवार, 15 जुलै 2017

कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाबाबत आमदार जयकुमार गोरेंना विचारले असता त्यांनी "वेट ऍण्ड वॉच'असे सांगत सक्षम जिल्हाध्यक्ष हवा आहे ना मग पहा, असे सांगितले. आनंदराव पाटील यांनी "मी पक्षात ताम्रपत्र घेऊन आलेलो नाही, की सर्व पदे मलाच द्या. ज्याला वाटते त्याने निवडणुकीला सामोरे ठेऊन जिल्हाध्यक्ष व्हावे', असे सांगितले. 

सातारा : पदाधिकारी निवडीच्या तोंडावर कॉंग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. पक्षाला सक्षम जिल्हाध्यक्ष असावा, या मुद्यावरून सध्याचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील (नाना) यांच्याविरोधात वातावरण निर्मिती सुरू झाली आहे. त्यासाठी माणचे आमदार जयकुमार गोरे यांचा गट सक्रिय झाला आहे. मात्र या प्रकारामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे टेन्शन वाढले आहे. 

गेली दहा वर्षे आनंदराव पाटील जिल्हाध्यक्ष आहेत. पण त्यांच्या कार्यपध्दतीवर आक्षेप घेत दुसरा गट आक्रमक झाला आहे. या दुसऱ्या गटाचे नेतृत्व माणचे आमदार जयकुमार गोरे करत आहेत. आमदार आनंदराव पाटील हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कट्टर समर्थक आहेत. युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ते विधान परिषदेचे आमदार, असा आनंदरावनानांचा प्रवास आहे. तब्बल 16 वर्षे ते युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. 

कॉंग्रेसच्या पदाधिकारी निवडी येत्या 15 दिवसांत होतील. निवडणुक प्रक्रिया राबविण्यासाठी निरिक्षकांचीही नेमणूक झालेली आहे. पण सध्या या निवडीवरून जिल्ह्यात कॉंग्रेसची दोन गटांत विभागणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे निष्ठावंत आमदार आनंदराव पाटील यांच्या गटाच्या विरोधात आमदार जयकुमार गोरेंनी मोर्चेबांधणी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची जिल्हाध्यक्ष निवड चुरशीची होणार आहे. 

दरम्यान, माण तालुक्‍यातून क्रियाशिल कार्यकर्त्यांची सभासद नोंदणीच झाली नसल्याने इच्छुकाला जिल्हाध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही. त्यामुळे नानांविरोधात दुसरा गट सक्रिय होऊनही मतदानावेळी विरोधी गटाच्या जिल्हाध्यक्षपदाच्या उमेदवाराला कोण मतदान करणार, असा मुद्दा खुद्द आमदार आनंदराव पाटील यांनी उपस्थित केला आहे. यापुढे जाऊन ते विरोधी गटाला थेट निवडणुकीने पदाधिकारी व्हा, उगाच पक्षाला वेठीस धरू नका, असा सल्ला देत आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षपदावरून कॉंग्रेसचे दोन तुकडे होण्यापासून वाचविण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कोणाची साथ देणार, याचीच कॉंग्रेसजनांना उत्सुकता आहे. 

 

संबंधित लेख