satara congress | Sarkarnama

कॉंग्रेसजन करणार आत्मचिंतन 

उमेश बांबरे 
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत झालेला पराभव कॉंग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागला आहे. खजील झालेले कॉंग्रेसजन आता आत्मचिंतन करणार आहेत.
या पराभवाला पक्षाचे झारीतील शुक्राचार्य जबाबदार ठरले आहेत. त्यांना बाजूला ठेवून कॉंग्रेसची पुन्हा नव्याने बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी काही कटू
निर्णय घेतले नाहीत तर आगामी विधानसभा निवडणुकीत एखादा आमदारही निवडून येणार नाही. 

जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेली दोन पंचवार्षिक कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष राहिला आहे. सुरवातीला 29 व नंतर 21 सदस्य संख्या होती. यावेळेस या संख्येत
वाढ होईल, अशी आशा कॉंग्रेसजनांना होती. पण त्यांचे मनसुबे धुळीस मिळाले. केवळ सात जागा कॉंग्रेसला जिंकता आल्या. गेली दोन पंचवार्षिक राष्ट्रवादीवर सत्तेत
वाटा देत नाहीत म्हणून ओरडणारे कॉंग्रेसच्या नेत्यांवर आता तोंड लपविण्याची वेळ आली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या
यावेळच्या निवडणुकीत जनतेने कॉंग्रेसला घरचा रस्ता दाखविला आहे. जिल्हा परिषदेत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून जी ताकद होतील तीही लयाला गेली आहे. 

कॉंग्रेसला सुरवातीपासूनच धरसोड वृत्ती नडली. सुरवातीला स्वबळाचा नारा देऊन भाजप व आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादीवर टीका केली. त्यानंतर सर्व
विरोधक राष्ट्रवादीच्या विरोधात एकवटतील, अशी परिस्थिती निर्माण होईल. असे सर्वांना वाटत होते. पण सत्तेच्या हव्यासापोटी सर्वांनीच स्वबळाचे दंड थोपटले. त्यात
कॉंग्रेस सर्वांत पुढे राहिली. पण त्यांना 64 आकड्याइतकेही उमेदवार मिळाले नाहीत. राष्ट्रवादीतील नाराज आपल्याकडे येतील, मग त्यांना आपण कॉंग्रेसमधून
उमेदवारी देऊन या आशेवर पृथ्वीराजबाबा व आनंदरावनाना राहिले. पण राष्ट्रवादीतील नाराज कॉंग्रेसपर्यंत पोचण्याआधीच भाजपने त्यांना अलगद उचलले. त्यामुळे
कॉंग्रेसची झोळी रिकामीच राहिली. यावर तोडगा काढण्यात कॉंग्रसचे नेते अपयशी ठरले. कऱ्हाड दक्षिणमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची आब
राखण्यासाठी शेवटच्या क्षणी कॉंग्रेसने राष्ट्रवादीशी हात मिळविणी केली. पण त्यातही यश आले नाही. परिणामी गेल्या वेळी आहेत इतक्‍याही जागा मिळविता आल्या
नाहीत. केवळ सात जागांवर समाधान मानावे लागले.

कॉंग्रेसचे बालेकिल्ले समजले जाणारे कऱ्हाड, माण, फलटण, कोरेगाव, वाई या तालुक्‍यात येथे अंतर्गत वाद व
नाराजीचा मोठा फटका पक्षाला बसला. पक्षातील प्रत्येक पदाधिकाऱ्याने स्वतः:ला नेता मानून मनमानी केली. याचा परिपाक या निवडणुकीतील घटलेले संख्याबळ
होय. निवडणुकीत झालेला हा पराभव आता कॉंग्रेसजनांच्या जिव्हारी लागला आहे. यातून खजील झालेले पृथ्वीराज बाबांसह नाना व इतर नेते आता या पराभवावर
आत्मचिंतन करणार आहेत. 
यामध्ये पक्षातील ज्या झारीच्या शुक्रचार्यांनी राष्ट्रवादी व भाजपशी हात मिळवणी करून कॉंग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार करण्याची भूमिका पार पाडली. त्यांना पक्षातून
दूर करून पुन्हा नव्याने पक्षाची बांधणी करण्याचा विचार बाबा व नाना करत आहेत. 

संबंधित लेख