satara collector office | Sarkarnama

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीस मिळाला "मुहूर्त' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 17 मे 2017

जलसंधारणाच्या कामांच्या पाहणीच्या निमित्ताने मुख्यमंत्री गुरुवारी (ता. 18) मुक्कामी व शुक्रवारी (ता. 19) जलयुक्त पाहणी दौरा करण्यासाठी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्‌घाटनाचा मुहूर्त उद्या (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजताचा साधून घेतला जाणार आहे. त्यासाठी डझनभर मंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. 

सातारा : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्‌घाटनाला अखेर मुहूर्त मिळाला. गुरुवारी (ता. 18) सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. इमारतीचे काम पूर्ण होऊन सहा महिने झाले तरी उद्‌घाटनाला मुहूर्त मिळेना म्हणून मावळते जिल्हाधिकारी आश्‍विन मुदगल या इमारतीत कामकाज सुरू केले होते. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीचा हेरिटेजमध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या इमारतीशेजारी दुसरी नवीन इमारत बांधण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी मंजूर करून घेतला होता. त्यांच्याच काळात इमारतीचे बांधकाम सुरू झाले. साधारण पाच कोटी रुपयांची ही इमारत आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव यांनी लक्ष घालून हे काम पूर्ण करून घेतले. 2016 मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. 31 मार्चला ही इमारत महसूल विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली. पण उद्‌घाटनासाठी मुहूर्त सापडेना. कधी निवडणुकीची आचारसंहिता, कधी मुख्यमंत्र्यांच्या तारखा मिळण्यात उद्‌घाटन लांबले. त्यामुळे मावळते जिल्हाधिकारी आश्‍विन मुदगल यांनी उद्‌घाटनाची वाट न पाहता नवीन कार्यालयात कामकाज सुरू केले. त्यांच्यासोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांनीही आपले कामकाज नव्या कार्यालयात सुरू केले. त्यामुळे नव्या इमारतीच्या उद्‌घाटनाला मुहूर्त कधी मिळणार, अशी चर्चा सुरू होती. 

संबंधित लेख