Satara Civil Hospital News | Sarkarnama

साताऱ्यातल्या अटकसत्राची जिल्हा रुग्णालयाला चिंता : 'व्हिआयपी रुग्णांसाठी' बेड पडणार अपुरे?

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अनेक गुन्ह्यांतील राजकीय वरदहस्त व आर्थिक बळ असणाऱ्या अनेकांच्या छातीत कळा येतात. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होतात. आता कोजागरीच्या रात्री सातारा शहरात झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी अटक सत्र सुरू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे 'टेन्शन' वाढले आहे. कोणते आणि किती बेड रिकामी ठेवायचे, ही विवंचना जिल्हा शल्य चिकित्सकांना पडणे साहजिकच आहे.

सातारा : न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर अनेक गुन्ह्यांतील राजकीय वरदहस्त व आर्थिक बळ असणाऱ्या अनेकांच्या छातीत कळा येतात. त्यामुळे ते रुग्णालयात दाखल होतात. आता कोजागरीच्या रात्री सातारा शहरात झालेल्या धुमश्‍चक्रीप्रकरणी अटक सत्र सुरू झाल्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे 'टेन्शन' वाढले आहे. कोणते आणि किती बेड रिकामी ठेवायचे, ही विवंचना जिल्हा शल्य चिकित्सकांना पडणे साहजिकच आहे.

मालदार आणि वजनदार संशयितांची एखाद्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यावर त्यांना अचानक हृदयविकाराचा त्रास सुरू होतो. छातीत दुखू लागते. त्यामुळे त्यांना जिल्हा कारागृहाऐवजी जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. खंडाळा तालुक्‍यातील जमिनीचा गैरव्यवहार असो अथवा खटाव तालुक्‍यातील दुष्काळ निधीचा अपहार असो, कंपनी चालकाला खंडणीसाठी मारहाणीचे प्रकरण असो... किंवा खासगी सावकारीतील संशयित असो... या सर्वांना अशाच पद्धतीने गेल्या काही दिवसांत रुग्णालयात 'जागा' मिळाली आहे.

संशयितांना 'व्हीआयपी ट्रीटमेंट' मिळत असल्याचा आरोप करत खटाव आणि खंडाळ्यातून आंदोलनाचे इशारेही देण्यात आले, तरीही जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाच्या कारभारात सुधारणा झाली नाही. राजकीय दबावातून, तसेच आर्थिक आमिषामुळे हे होत असल्याचा आरोप आंदोलनाचा इशारा देणाऱ्यांनी केले होते. त्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणाही काम करत असल्याचा आरोप होत आहे.

सध्या दिवाळीची धामधूम सुरू आहे. सर्व जण दिवाळी कशी साजरी करायची याच्या विचारात आहेत. रुग्णालय व्यवस्थापनाला मात्र, बेड रिकामे कसे करायचे, या चिंतेने ग्रासले आहे. कोजागरीच्या रात्री खासदार व आमदारांच्या समर्थकांत टोल नाक्‍याच्या ठेक्‍यावरून साताऱ्यात धुमश्‍चक्री झाली. त्यानंतर पोलिसांनी खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या 400 समर्थकांवर खुनाच्या प्रयत्नांचा गुन्हा दाखल केले आहेत. परस्परविरोधी तक्रारीही आहेत. यामध्ये आमदार, खासदारांच्या खास विश्‍वासातील बहुतांश जणांचा समावेश आहे. त्यातच साताऱ्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणालाही सोडणार नाही, अशी भूमिका पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी घेतली आहे.

अटक सत्रही सुरू आहे. त्यामुळे दोन्ही बाजूचे अनेक 'मान्यवर' पोलिसांच्या ताब्यात जाणार आहेत. गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्याने लवकर जामीन मिळण्याचीही शक्‍यता नाही. त्यामुळे अनेक जण जिल्हा रुग्णालयात बेड मिळण्यासाठी प्रयत्न करणार, हे नक्की. त्यामुळे रुग्णालय व्यवस्थापनाचा ताण वाढलेला दिसतो. एखादा दुसरा ठीक; पण एवढ्या संख्येने जर संशयित दाखल अटक होणार असतील, तर त्यांना ठेवण्यासाठी बेड कसे उपलब्ध करायचे याचीच चिंता त्यांना सतावत आहे.

 

 

संबंधित लेख