satara-chandrakant-patil-loksabha-election | Sarkarnama

साताऱ्याचा खासदार भाजपचाच असेल : चंद्रकांत पाटील

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार भाजपचा असेल आणि पाच आमदारही, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

उंब्रज (ता. कराड, सातारा) : पश्चिम महाराष्ट्र दोन्ही काँग्रेसची जहागिरी नाही. आजपर्यंत या दोन्ही काँग्रेसच्या साताऱ्यातील नेत्यांनी जनतेला झुलवत ठेवले. आता तुम्ही कितीही गप्पा मारल्या, यात्रा काढल्या तरी आगामी लोकसभा निवडणुकीत साताऱ्याचा खासदार भाजपचा असेल आणि पाच आमदारही, असे भाकीत महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.

चोरे (ता. कराड) येथील कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चारेगावकर, जिल्हापरिषद अध्यक्ष मनोज घोरपडे, हिंदुराव चव्हाण, जितेंद्र पवार, सागर शिवदास, संजय घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, सुरेश पाटील उपस्थित होते.
 
चंद्रकांत पाटील म्हणाले, प्रत्येक निवडणूकींत भाजप सरस ठरत आहे. निवडणूक आली की काँग्रेसवाले देव पाण्यात ठेवतात. आणि निवडणूक जिंकू दे असा धावा करतात. निवडणुकीत विजय आपला राहिला नसल्याचे त्यांच्या लक्षात आल्याने विरोधकांना एकत्र यावे लागते आहे. कारण ते भाजपशी एकटे एकटे लढू शकत नाहीत. 

भाजप सरकारने 34 हजार कोटींची कर्जमाफी करून 17 हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

संबंधित लेख