satara bjp appeals chandrakant patil | Sarkarnama

पावसकरांचे ऐकून चंद्रकांतदादा साताऱ्यात उभे राहिले तर खरंच उदयनराजेंना पाडतील? 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 सप्टेंबर 2018


साताऱ्यात राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले खासदार आहेत. उदयनराजेंचे सर्वपक्षांशी मैत्रीची संबंध आहेत. मात्र प्रत्यक्ष निवडणुकीवेळी उदयनराजे राष्ट्रवादीला प्राधान्य देतील, असे मानले जात आहे. दुसऱ्या बाजूला भाजपकडे तगडा उमेदवार नाही. चंद्रकांत पाटलांनी पावसकरांची मागणी मान्य केली तर साताऱ्यातील लढत रंगतदार होवू शकते. 

कऱ्हाड (सातारा): महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पक्षाची गरज म्हणून सातारा लोकसभा किंवा कऱ्हाड दक्षिणमधून निवडणूक लढावी. त्यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याची जबाबदारी जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते घेतील, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी व्यक्त केले आहे. 

पावसकर यांनी पत्रकात म्हटले की, मंत्री पाटील यांनी कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते. मात्र भाजपच्या जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या आग्रहास्तव पक्ष व सामान्य जनतेची गरज म्हणून त्यांना पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक रिंगणात उतरावेच लागेल. 

त्यासाठी त्यांनी सातारा जिल्ह्यातील सातारा लोकसभा किंवा कोणताही मतदार संघ निवडला तसेच प्रसंगी कऱ्हाड दक्षिण मतदारसंघातून लढण्याचे पक्षाने आदेश दिल्यास त्यांना विक्रमी बहुमतानी विजयी करण्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे. मंत्री पाटील हे संघटनेचे कार्यकर्ते असून त्याच मुशीत त्यांचे नेतृत्व उदयास आले आहे. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक मत व्यक्त केले असले तरी संघटनेचा निर्णय म्हणून सुध्दा त्यांना यापुढेही पक्षाने आदेश दिल्यास त्याचे पालन करून निवडणूक रिंगणात उतरावे, अशी कार्यकर्त्यांची मागणी असल्याचे पावसकर यांनी म्हटले आहे. 

संबंधित लेख