SATARA alligation on surendra gudage | Sarkarnama

NCP चे ZP सदस्य सुरेंद्र गुदगेंच्या त्रासाला कंटाळून मायणीत आत्महत्या 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

मायणी (ता. खटाव) येथील केबल व्यवसायिक मोहन बाबुराव जाधव यांनी सोमवार दि. 26 रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येस मायणी बॅंकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे हे कारणीभूत असल्याची चिठ्ठी जाधव यांच्या खिशात आढळून आली आहे. त्यांचा मुलगा राजाराम जाधव यांनीही गुदगे यांच्या त्रासाला कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे. 

सातारा : मायणी (ता. खटाव) येथील केबल व्यवसायिक मोहन बाबुराव जाधव यांनी सोमवार दि. 26 रोजी सकाळी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या आत्महत्येस मायणी बॅंकेचे अध्यक्ष व राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे हे कारणीभूत असल्याची चिठ्ठी जाधव यांच्या खिशात आढळून आली आहे. त्यांचा मुलगा राजाराम जाधव यांनीही गुदगे यांच्या त्रासाला कंटाळून वडीलांनी आत्महत्या केल्याची तक्रार दिली आहे. 

दरम्यान, गुदगेंना तातडीने अटक करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी मायणी पोलीस दूरक्षेत्रावर मोर्चा काढून ठिय्या मांडला होता. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीसांनी सुरेंद्र गुदगेंविरोधात भादंवि कलम 306 अन्वये आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, गुदगेंना अटक करावी या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्यावतीने मायणी बंद पुकारण्यात आला आहे. 

याबाबतची अधिक माहिती अशी, मूळचे नेवरी (ता. खानापूर ) येथील रहिवासी असलेले मोहन जाधव गेली अनेक वर्षे व्यवसायानिमित्त मायणीत स्थायिक झाले होते. ते गेली अनेक वर्षे केबलचा व्यवसाय करीत आहेत. व्यवसायाबरोबरच सामाजिक, राजकीय कार्यात त्यांचा सक्रीय सहभाग होता. सुमारे सहा वर्षापूर्वी ते भाजपाचे माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. तर पाच वर्षापूर्वी ते गुदगे गटात गेले. सहा महिन्यापूर्वी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत ते परत मूळ डॉ. येळगावकर गटात परतले होते. तसेच त्यांच्या मुळे एक दोन प्रभागांत गुदगे समर्थकांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे सुरेंद्र गुदगे हे जाधव यांना गेली काही दिवस वारंवार त्रास देत होते. मायणी बॅंकेच्या कर्जापोटी दिलेल्या कोऱ्या धनादेशाचा गैरवापर करण्याबरोबर केबल व्यवसायावर तक्रार करून व्यवसाय बंद पाडण्याची धमकी दिली जात होती. या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी मयत जाधव यांच्या खिशात सापडली आहे. 

जाधव हे सकाळी एस टी बस स्थानक परिसरात गेले होते. ते घरी आल्यानंतर त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. फिर्यादी मुलगा कामानिमित्त बाहेर गेला होता. त्यास पत्नी सारीका हिचा फोन आल्यानंतर तो तातडीने घरी गेला व त्यानंतर त्यांनी चारचाकी वाहनातून विटा येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले मात्र त्यांचे उपचारापूर्वीच निधन झाल्याचे तेथील डॉक्‍टरांनी त्यांना सांगितले. त्यानंतर विटा ग्रामीण रूग्णालयात पोस्टमॉर्टेम करण्यात आले. 

केबलवाल्या दाजींनी आत्महत्या केल्याचे वृत्त परिसरात पसरल्यानंतर सायंकाळी पाच नंतर शेकडो ग्रामस्थ चांदणी चौक परिसरात जमले. विटा येथून मृतदेह आल्यानंतर ग्रामस्थांनी मृतदेहासह नागरिक पोलीस चौकीवर पोहोचले. गुदगेंवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, तातडीने अटक करा या मागणीकरीता बराच वेळ पोलीस दूरक्षेत्रासमोर ठिय्या मांडला होता. त्यानंतर पोलीसांनी सुरेंद्र गुदगे याच्यावर कलम 306 प्रमाणे आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर प्रेतयात्रा पोलीस ठाण्यातून जाधव यांच्या निवासस्थानी नेण्यात आली. रात्री उशिरा तणावपूर्ण व शोकाकूल वातावणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत काळे, पोलीस निरीक्षक यशवंत शिर्के, म्हसवडचे सपोनी श्री. मालोजीराव देशमुख, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर आदींनी भेट दिली. 

संबंधित लेख