satara alligation on nangre patil | Sarkarnama

IG विश्‍वास नांगरे पाटलांनीच 'शांतीदूत' हटविला : सुरेश खोपडे 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

सातारकरांची अस्मीता बनलेल्या या शांतीदूताला हटविण्यामागे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील असल्याचा आरोप निवृत्त पोलिस महासंचालक सुरेश खोपडे यांनी केला.

सातारा : अन्यायाची दाद मागण्यासाठी येणाऱ्या सर्वसामान्याला पोलिस मुख्यालयाचा परिसर आपला वाटावा या उद्देशाने शांतीदूताचा पुतळा बसविला होता. सातारकरांची अस्मीता बनलेल्या या शांतीदूताला हटविण्यामागे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील असल्याचा आरोप निवृत्त पोलिस महासंचालक सुरेश खोपडे यांनी केला. सातारकरांची लोकभावना विचारात घेऊन याबाबत लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला. 

श्री. खोपडे म्हणाले, पोलिस अधिक्षक म्हणून आलो तेंव्हा मुख्यालयाच्या इमारतीबाहेर चार तोफा होता. सर्वसामान्यांवर अन्याय झाल्यानंतर अन्यायग्रस्त न्याय मिळण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयात येतात. मात्र बाहेर तोफा पाहिल्यानंतर न्याय मिळेल असे सर्वसामान्यांला वाटेल का? तो भयमुक्त वातावरणात प्रश्‍न मांडू शकेल का ? असा प्रश्‍न मनात यायचा. त्यातून सामान्यांना पोलिसांचा आधार वाटावा, आपल्याकडे असलेली शस्त्रे कशासाठी आहेत याची पोलिसांनाही जाणीव असावी यासाठी शांतीदूताचा पुतळा बसविण्याचा निर्णय घेतला. बंदूक, गोळ्या यामाध्यामातून शांततेचे प्रतीक उभारले. बंदूकीची काडतुसे वितळवून हे प्रतीक उभारण्यासाठी पुणे येथील एका कारागिराकडून पुतळ्याचे काम करून घेतले होते. 

सातारा शिवरायांची भूमी आहे. याच भुमित शांतीदूताचा पुतळा संपूर्ण साताऱ्याची अस्मिता बनला होता. सर्वसामान्यांना हा परिसर आपला वाटत होता. कालानुरूप पोलिस दलात आवश्‍यक असलेल्या बदलांबाबत मी नेहमीच प्रयत्न केले. निवृत्तीनंतरही माझे ते काम सुरू आहे. मात्र, दुर्देवाने पोलिस दलातील काही जणांकडून त्याचा द्वेष होत आहे. त्याच सूडबुध्दीतून साताऱ्यातील शांतीदूताचा पुतळा हटवण्याचा उद्योग झाला आहे. या मागे विश्‍वास नांगरे-पाटील आघाडीवर असल्याचा आरोप श्री. खोपडे यांनी केला. 

शांतीदूताचा पुतळा हलवण्याचे काम चुकीचे झाले आहे. सातारकरांचा अभिमान असलेला हा पुतळा इतरत्र कशासाठी हलवायचा. पुतळा त्याच जागी राहिला पाहिजे. हा प्रकार समजल्यावर अस्वस्थ झालो. सातारकरांशी चर्चा करून, त्यांची मते आजमावून प्रसंगी त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनही केले जाईल असेही ते म्हणाले. तत्पूर्वी प्रशासनाशी बोलून त्यांनी योग्य कारण व लोकांना पटणार अशी भूमीका मांडली तर त्याचेही स्वागत करणार असेही ते म्हणाले. 
 

संबंधित लेख