sasane nagar congress | Sarkarnama

जिल्हाध्यक्ष ससाणेंचे चालेना, कॉग्रेसची गाडी काही पळेना ! 

मुरलीधर कराळे 
रविवार, 3 सप्टेंबर 2017

कॉगेसला उर्जितावस्था येण्याची गरज : देशमुख 
कॉग्रेसच्या दयनिय अवस्थेविषयी पक्षाचे राज्याचे सरचिटणीस विनायक देशमुख यांनी खंत व्यक्त केली. कॉग्रेसला उर्जितावस्था आणण्याची गरज आहे. आपण विरोधी पक्षात आहोत, हे लक्षात घेऊन सरकारचे वाभाडे काढण्याचे सोडून प्रत्येकजण स्वतःच्या खुर्च्या सांभाळण्यात व्यस्त आहे. हे दुर्देवी आहे. आगामी काळात पक्षातील सर्वच नेत्यांनी लक्ष देण्याची गरज आहे, अशी शब्दांत देशमुख यांनी अपेक्षा व्यक्त केल्या. 

महिला कॉग्रेससाठी सक्षम नेतृत्त्व हवे : मंगल भुजबळ 
महिला आघाडीला उर्जितावस्था आणण्याची गरज आहे. शहरात महिलांचे संघटन करणे गरजेचे आहे. कोणी पदाचा गैरवापर करू नये. कार्यक्षम नेतृत्त्व असलेल्या महिलेला संधी दिल्यास कॉंग्रेसला चांगले दिवस येतील, असे मत युवक कॉंग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस मंगल भूजबळ यांनी व्यक्त केले. 

नगर : जिल्ह्यातील दोन दिग्गज नेत्यांच्या वादामध्ये कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची अवस्था बिकट झाली आहे. पक्षांतर्गत खेळीमध्ये ससाणेंना स्वत: निर्णय घेता येईनात. त्यातूनच स्वत:चे बस्तान कसे बसवायचे याची चिंता त्यांना लागून राहिली आहे. परिणामी नगर कॉंग्रेसची गाडी अडखळली आहे. 

कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता 
विरोधी पक्ष म्हणून कॉग्रेस पक्षाचे काम दिसून येत नाही. ना मोठे मेळावे, ना कुठे चर्चासत्रे. संघर्ष यात्रा निघाली, तिलाही जिल्ह्यातून कॉगेसची यात्रा म्हणण्याऐवजी विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचाच मुखवटा होता. सरकारवर आंदोलनात्मक पवित्रा घेऊन तुटून पडण्याऐवजी कॉगेसने आपली तलवार म्यान केलेली दिसते. त्याची कारणे काय आहेत, हे कार्यकर्ते जाणून आहेत. त्यामुळेच कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. 

जयंत ससाणे यांचा वनवास 
कॉग्रेसमध्ये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे जिल्ह्यातील वर्चस्व सर्वश्रूत आहे. त्यात दुसरे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांचीही चलती आहे. कॉग्रेसमधील या दोन दिग्गजांमध्ये जिल्हाध्यक्ष ससाणे काय निर्णय घेणार? आधीच ससाणे यांचे राजकीय भवितव्य अडचणीत आहे. श्रीरामपूर विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. त्यामुळे विधानसभेची तयारी करणे शक्‍य नाही. श्रीरामपूर शहरातील सत्ता आघाडीची असली, तरी कृषक समाजच्या अध्यक्षा अनुराधा आदिक यांच्या ताब्यात आहे. कसेही असले, तरी राष्ट्रवादीचे वर्चस्व आलेच. उरलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सत्तेतही ससाणे यांचे खुप काही चालत नाही. बाजार समितीलाही फारसे महत्त्व नाही. आमदार भाऊसाहेब कांबळे कॉग्रेसचेच असले, तरी त्यांचे आणि ससाणे यांचे फारसे जमत नाही. साहजिकच ससाणे यांची अवस्था ना घर का न घाटका, अशी झाली आहे. 

महिला आघाडी भांडणात व्यस्त 
कॉग्रेसच्या महिला आघाडी ग्रामीणच्या जिल्हाध्यक्षा माजी जिल्हा परिषद सदस्य कांचन मांढरे आहेत. त्या त्यांच्यापरीने ग्रामीण भागात काम पाहतात. जिल्ह्याचा आत्मा असलेल्या नगर शहरात मात्र जिल्हाध्यक्षपदाचे पद रिक्त आहे. मध्यंतर महिलांच्या पक्षांतर्गत झालेल्या वादात सविता मोरे यांनी हे पद गमावले. कॉग्रेसची महिला आघाडी भांडणात अडकली. पदाधिकाऱ्यांत झालेल्या मारामाऱ्या राज्यभर गाजल्या. वरिष्ठांचा कार्यकर्त्यांवर वचक नसल्याचेच हे द्योतक आहे. जिल्हाध्यक्ष या नात्याने ससाणे हा वाद मिटविण्यात अयशस्वी झाले. महिला कॉग्रेसमधील नाचक्की म्हणजे पक्षाला मागे घेऊन जाणारी आहे. 

युवकचेही काही चालेना
युवक कॉग्रेससही शांत आहे. युवक कॉगेसची सूत्रे सुजय विखे यांच्याकडे आहेत. साहजिकच वडील राधाकृष्ण विखे सांगतील, तेच स्पष्ट धोरण आहे. त्यामुळे युवक कॉग्रेसचा आवाजही दबला आहे. महत्त्वाच्या आघाड्यांची ही अवस्था असल्यामुळे ज्येष्ठ नेते कोणाच्या जीवावर उड्या मारणार, हाही प्रश्न आहे. 

संबंधित लेख